बालिकावधू फेम टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने आत्महत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी अभिनेता व निर्माता राहुल राज सिंग याचा अटकपूर्व जामीन रद्दबातल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्या दोघांमधील शेवटच्या संभाषणावरून ते दोघेही गाढ प्रेमात होते असे दिसून येते, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्या. पी.सी.घोष व न्या. अमिताव रॉय या सुटीतील न्यायाधीशांनी प्रत्युषाची आई सोमा बॅनर्जी हिने राहुलचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळताना सांगितले की, सिंग यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी कुठलेही ठोस कारण नाही. प्रत्युषा व राहुल यांचे शेवटचे संभाषण हे ते एकमेकांच्या खरोखर प्रेमात होते असे दाखवणारे आहे, त्यामुळे कुठल्याही ठोस कारणाशिवाय राहुलचा अटकपूर्व जामीन रद्द करता येणार नाही. जर तपास संस्थेला भादंवि ३०२ अन्वये हा खुनाचा प्रकार असल्याचे दिसून आले असते तर आरोपीला ताब्यात घ्यावे लागले असते. आरोपीची भूमिका स्पष्ट करणारी कुठलीही चिठ्ठी सापडलेली नाही. प्रत्युषाच्या आईच्या वकिलांनी सांगितले की, राहुलला कोठडीत घेऊन जाबजबाब घेण्याची आवश्यकता आहे. कारण आताच्या चौकशीत अनेक कमतरता आहेत. त्यामुळे राहुल हा पुरावा नष्ट करण्याची शक्यता आहे. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला प्रत्युषाच्या आईने मुलीच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राहुलला दिलेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राहुल याला ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे कारण तपास अजून चालू आहे व तो पुरावे नष्ट करू शकतो. पंचनाम्यात मुलीच्या अंगावर जखमांच्या खुणा आढळून आल्या होत्या. उच्च न्यायालयाने सिंग याला २५ एप्रिल रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. राहुल राज सिंग याने त्याच्यावरचे सर्व आरोप फेटाळले होते.

Story img Loader