कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येताच देशभरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. भाजपाची मोठी पीछेहाट झाल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी रान उठवायला सुरुवात केली आहे. आता इतर राज्यांमध्येही असाच निकाल लागेल, असे दावे केले जात आहेत. एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे मोदी सरकारने CBI संचालक या महत्त्वाच्या पदावर प्रवीण सूद यांची निवड केली आहे. प्रवीण सूद हे सध्या कर्नाटकचे पोलीस महासंचालक असून काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार डी. के. शिवकुमार यांच्याशी त्यांचं वितुष्ट असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे या नियुक्तीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

उच्चस्तरीय समितीने केली नियुक्ती

प्रवीण सूद यांची सीबीआय संचालकपदी उच्चस्तरीय समितीनं नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश होता. प्रवीण सूद यांच्या नियुक्तीवर समितीच्या बैठकीत अधीर रंजन चौधरी यांनी आक्षेप घेतल्याचं बोललं जात आहे.

कोण आहेत प्रवीण सूद?

प्रवीण सूद सध्या कर्नाटकचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. कर्नाटकमधील कार्यकाळात प्रवीण सूद यांचा कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार डी. के. शिवकुमार यांच्याशी वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. शिवकुमार यांनी प्रवीण सूद यांच्यावर भाजपाला योग्य ठरतील अशा भूमिका घेतल्याचा आरोप केला होता. सूद कर्नाटकचे महासंचालक असताना जवळपास २५ काँग्रेस नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून एकाही भाजपा नेत्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही, असा दावा शिवकुमार यांनी केल्याचं इंडिया टुडेनं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, काँग्रेसची सत्ता आल्यानंतर सूद यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराच शिवकुमार यांनी दिला होता, असंही या वृत्तात म्हटलं आहे.

१९८६ सालचे आयपीएस अधिकारी

प्रवीण सूद हे १९८६ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी त्यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान संचालक सुबोध जयस्वाल यांचा कार्यकाळ २५ मे रोजी संपुष्टात येत असून तयानंतर प्रवीण सूद पदभार स्वीकारतील.

१९८९ साली केली पोलीस कारकिर्दीला सुरुवात

मैसूरचे पोलीस सहअधीक्षक म्हणून प्रवीण सूद यांनी आपल्या कारकिर्दीला १९८९ साली सुरुवात केली. त्यानंतर ते बेल्लारी आणि रायचूरचे पोलीस अधीक्षक झाले. पुढे प्रवीण सूद बंगळुरूचे पोलीस उपायुक्तही झाले. याशिवाय त्यांनी १९९९मध्ये मॉरिशसमध्ये डेप्युटेशनवर काम केलं आहे.भारतात परत आल्यानंतर सूद यांनी आयआयएम बंगळुरूमधून पब्लिक पॉलिसी आणि मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं असून न्यूयॉर्कमधील मॅक्सवेल विद्यापीठातूनही प्रशासकीय व्यवस्थापनाचं शिक्षण घेतलं आहे.

दहशतवाद्यांविरोधात काम

२००४ ते २००७ या चार वर्षांत प्रवीण सूद यांनी मैसूरचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलं. दहशतवाद्यांच्या नेटवर्कवर त्यांनी सविस्तर काम केलं आहे. त्यानंतर २०११पर्यंत प्रवीण सूद यांनी बंगळुरू वाहतूक विभागात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली.

राष्ट्रपती पदकानंही सन्मानित

प्रवीण सूद यांना १९९६ साली उत्तम पोलीस सेवेसाठी मुख्यमंत्री सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आलं. २००२ साली त्यांना मॉरिशसमधील सेवेसाठी पोलीस पदक बहाल करण्यात आलं. तसेच विशेष पोलीस सेवेसाठी त्यांना २०११ साली राष्ट्रपती पदकानेही सन्मानित करण्यात आलं आहे. २०१३-१४ साली प्रवीण सूद यांनी कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला.

कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती

कर्नाटकमध्ये प्रवीण सूद यांनी आधी गृह विभागाचे प्रधान सचिव, कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि प्रशासनाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

Live Updates