कुख्यात गँगस्टर अतिक अहमदची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. पोलिसांच्या ताब्यात असतानाच अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या. अतिक हा एक माफिया होता, तसेच त्याच्यावर पोलिसांत १०० हून अधिक केसेस दाखल होत्या. याच अतिकला शहीद असा दर्जा देण्याची मागणी एका काँग्रेस नेत्याने केली आहे. तसेच अतिकला मृत्यूपश्चात भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणीदेखील केली आहे. ही विचित्र मागणी प्रयागराजच्या वॉर्ड क्रमांक ४३ (दक्षिण मलाका) मधून निवडणूक लढणारे राज कुमार सिंह उर्फ रज्जू यांनी केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या मागणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान, या मागणीनंतर काँग्रेसने रज्जू यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे.
तसेच राज कुमार उर्फ रज्जू यांच्यावर पोलिसांनी देखील कारवाई केली आहे. प्रयागराज पोलिसांनी रज्जू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. राज कुमार यांनी अतिक आणि अशरफच्या कबरीवर तिरंगा ठेवला होता. तसेच दोघेही शहीद झाल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
माध्यमांशी बोलताना राजकुमार म्हणाले की, योगी सरकाने अतिकची हत्या घडवून आणली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा.
काय म्हणाले राज्जू?
राजकुमार रज्जू यांचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यात त्यांनी म्हटलं आहे की, अतिक एक लोकप्रतिनिधी होते. ते शहीद झाले आहेत. त्यांना शहीद असा दर्जा दिला जावा. मुलायमसिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळू शकतो तर अतिक यांचा देखील गौरव केला जावा. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला पाहिजे.
हे ही वाचा >> कोण आहे अतिक अहमदची पत्नी शाईस्ता परवीन? पोलिसाची मुलगी असूनही ‘या’ कारनाम्यांमुळे झाली मोस्ट वाँटेड
तसेच रज्जू यांनी अतिक यांच्या कबरीवर तिरंगा का फडकवला नाही? असा सवालही उपस्थित केला आहे. रज्जू म्हणाले की, “अतिक अहमद यांना भरतरत्न पुरस्कार दिला जावा अशी मी मागणी करतो. अतिक अहमद यांना राजकीय सन्मान का दिला गेला नाही? याचं उत्तर या सरकारने द्यावं.” दरम्यान, राज कुमार हे सगळं बरळत असताना इतर काँग्रेस नेते त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. तसेच एक काँग्रेस नेते त्यांना म्हणाले, “तुम्ही हे असं वक्तव्य का करत आहात?”