भारतीय चलनातील जुन्या म्हणजेच २००५ सालापूर्वीच्या चलनी नोटा बदलण्याची सोय आता सर्व बँकांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. २००५ सालापूर्वी वापरात आणलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या भारतीय चलनी नोटा बदलण्यासाठी १ जानेवारी २०१५ पर्यंतचा अवधी देण्यात आला असून कोणत्याही बँकेत जाऊन नोटा बदलता याव्यात यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने निर्देश दिले आहेत.
२००५ सालापूर्वी वापरात आणलेल्या चलनी नोटा परत घेण्याचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने घेतला. आतापर्यंत ३० जूनपूर्वी सर्व जुन्या चलनी नोटा परत घेण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु, ५०० आणि १००० च्या दहा नोटा बदलण्यासाठी संबंधित माणसाला ओळखपत्राची आवश्यकता असायची. परंतु, आता रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार कोणत्याही बँकेत जाऊन लोक २००५ सालापूर्वी वापरात आणलेल्या ५०० तसेच १००० च्या चलनी नोटा बदलू शकतील. त्याचबरोबर यापूर्वी घातलेली नोटांच्या संख्येवरील मर्यादाही बँकेने शिथील केली आहे.
२००५ सालापूर्वी वापरात आणलेल्या कोणत्याही चलनी नोटांवर छपाईचे वर्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे अशा चलनी नोटा २००५ पूर्वीच्या आहेत हे सहजपणे ओळखता येते. त्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने ज्या चलनी नोटा वितरित केल्या त्यावर नोटेच्या एका बाजूला छपाईचे वर्ष नमूद केले आहे.  या नोटांच्या सुरक्षिततेबाबतही अधिक खबरदारी घेण्यात आली आहे, असे बँकेने स्पष्ट केले.

Story img Loader