लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: अर्थसंकल्पातून आखल्या जाणाऱ्या आर्थिक धोरणांचा फायदा कोणाला होईल याबद्दल अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी प्रसारमाध्यमांपुढे बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाने शेअर बाजारातही शुक्रवारच्या (३१ जानेवारी) व्यवहारात चैतन्य निर्माण केले. जबरदस्त आशावादातून सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांकांसाठी सलग चौथे सत्र मजबूत कमाईचे राहिले. बीएसई सेन्सेक्सला ७७,५००, तर एनएसई निफ्टीने २३,५०० या महत्त्वाच्या पातळ्यांना त्यामुळे ओलांडता आले.

अर्थसंकल्पाआधीच्या शुक्रवारच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स ७४०.७६ अंशांच्या दमदार कमाईसह ७७,५००.५७ या पातळीवर स्थिरावला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५८.९० अंशांची भर घालून २३,५०८.४० वर बंद झाला. बाजारात झालेल्या सर्वव्यापी खरेदीने दोन्ही निर्देशांकांनी जवळपास एक टक्क्यांची वाढ साधली. शेअर बाजाराचा हा सलग चौथा सकारात्मक बंद स्तर गुंतवणूकदारांच्या अर्थसंकल्प २०२५-२६ च्या महत्त्वपूर्ण घडामोडीबाबत अपेक्षा स्तरही उंचावला असल्याचे सुचविणारा आहे. शनिवारी, अर्थसंकल्पदिनी शेअर बाजारातील व्यवहार हे सकाळी ९.१५ वाजल्यापासून, दुपारी ३.३० वाजेपर्यंत नित्य वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहतील.

मध्यमवर्गीय, महिला आणि गरीब या त्रिसूत्रीवरच संभाव्य धोरणांतून लक्ष केंद्रित केले जाईल असे संकेत देतानाच, यंदाच्या अर्थसंकल्पातून समावेशकता गुंतवणूक आणि नावीन्यता यावर भर दिला जाईल, असेही पंतप्रधान मोदींनी सूचित केले. अर्थात देशापुढील सध्याची आर्थिक आव्हाने आणि लोकांच्या आस-अपेक्षांचा समतोल अर्थसंकल्प साधेल, अशा आशांना प्रत्यक्षरूप मिळेल असाच त्यांच्या भाषणाचा रोख राहिला. याच जोडीला, अर्थसंकल्पाआधी लोकसभेपुढे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ठेवलेल्या आर्थिक पाहणी अहवालाने, भारतीय अर्थव्यवस्थेत सर्व काही आलबेल असल्याचा दिलेला निर्वाळा शेअर बाजारात गुंतवणूकदारांना भावताना दिसून आला. पाहणी अहवालाचे तपशील आणि मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या पत्रकार परिषदेनंतर बाजारात निर्देशांकांनी उच्चांकी सूर मारला.

७७,५००

सेन्सेक्स

७४१

अंश मुसंडी

Story img Loader