सौरभ कुलश्रेष्ठ
शिवसेना नेते सुभाष देसाई यांचे मत
गेली चार वर्षे शिवसेना आणि भाजपात कटुता आली होती. युती झाल्यावर दोन्ही बाजूने ही कटुता दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे. या कटुतेचे निवडणुकीत पडसाद उमटू नयेत यासाठीच खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना दगाफटक्याबाबत इशारा दिला आहे, असे शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. तसेच शिवसेनेच्या गतवेळच्या १८ जागांपेक्षा यंदा जास्त जागा निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
* शिवसेना आणि भाजप युती या निवडणुकीत कोणत्या मुद्दय़ांवर लोकांसमोर जाणार?
सुभाष देसाई – सध्या युतीच्या समोर पर्यायच नाही असे राजकीय चित्र आहे. राष्ट्रीय प्रश्नांना सक्षमतेने तोंड देऊ शकेल ही ताकद फक्त भाजप-शिवसेना राजवटीतच आहे. त्यातही देशाची सुरक्षा आणि विकास या दोन प्रमुख मुद्दय़ांवर आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. विखुरलेले विरोधी पक्षातून देशाला खंबीर नेतृत्व मिळू शकत नाही. देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. अशा वेळी शेजारी राष्ट्रांनी आगळीक केल्यास जशास तसे उत्तर देण्याची क्षमता नेतृत्वात असायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची सुरुवात केली आहे. दुसरा मुद्दा विकासाचा आहे. केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या हिताच्या अशा विविध योजना राबवत आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. स्वच्छ भारत, अटल पेन्शन योजना, आयुष्मान भारत, मेक इन इंडिया, शेतीला साहाय्य करणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकार सामान्यांच्या विकासासाठी काम करत असल्याचे दिसते. अर्थात काही योजनांचा दृश्य परिणाम दिसायला वेळ लागत असतो. त्यामुळेच विकासाच्या या योजनांचे लाभ पूर्णपणे मिळावेत यासाठी मोदी सरकारला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन आम्ही मतदारांना करणार आहोत.
* गेली चार वर्षे भांडल्यावर इतक्या लवकर भाजप-शिवसेनचे मनोमीलन खरोखरच झाले का?
दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये मनोमीलन झाले आहे. एकत्र मेळावे सुरू झाले आहेत. कोल्हापुरात संयुक्त प्रचारसभाही झाली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरताना दोन्ही पक्षांचे लोक एकत्र जाऊन अर्ज भरत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गांधी नगरला गेले. त्यातून युतीच्या कार्यकर्त्यांत योग्य तो संदेश गेला आहे.
* मनोमीलन झाले असेल तर दगा करणार नाही व करू नका हे सांगण्याची वेळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर का यावी? मनात अजून काही शंका आहेत का?
पूर्वीच्या निवडणुकांचे काही अनुभव चांगले नाहीत. ज्याचे जास्त आमदार निवडून येणार त्याला मुख्यमंत्रिपद असे सूत्र ठरल्यानंतर १९९९च्या निवडणुकीत गडबड झाली होती. एकमेकांचे उमेदवार पाडले गेले. हे लक्षात घेऊन खबरदारी घेतली आहे. आता गेली चार वर्षे आम्ही दोन्ही पक्ष तीव्रतेने भांडलो. ती भावना या निवडणुकीत प्रकट होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
* ईशान्य मुंबईत खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध का? भाजपला त्यांचा उमेदवार निवडायचा अधिकार नाही का?
किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा पक्ष म्हणून विरोध नाही. मात्र ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात स्थानिक शिवसैनिक आणि लोकप्रतिनिधी हे सोमय्यांवर प्रचंड नाराज आहेत. त्यांच्यात खूप खदखद आहे. आता एक एक जागा महत्त्वाची असल्याने भाजपने मागील निवडणुकीत जिंकलेली ही जागा पुन्हा निवडून यावी अशीच शिवसेनेची इच्छा आहे. त्यामुळेच स्थानिक नाराजीमुळे कसलीही गडबड होऊ नये, भाजपचे नुकसान होऊ नये यासाठीच सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न आहेत. भाजपचे नेते योग्य निर्णय घेऊन हा तिढा सोडवतील अशी खात्री आहे.