पीटीआय, नवी दिल्ली, पाटणा

नवी दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीनंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून वैध कारणाशिवाय कोणालाही पादचारी पुलावर रेंगाळण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे अशी माहिती अधिकाऱ्याने सोमवारी दिली. चेंगराचेंगरीमध्ये किमान १८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वेच्या ढिसाळ व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. त्यानंतर रेल्वेने कठोर उपाययोजना केल्या आहेत.

पादचारी पुलावर अनेकजण कोणत्याही कारणाशिवाय उभे असतात किंवा रेल्वेची प्रतीक्षा करत असतात. त्यामुळे इतर प्रवाशांना दुसऱ्या फलाटांवर पोहोचण्यात अडथळे येतात. आता आम्ही कोणालाही वैध कारण असल्याशिवाय तिथे उभे राहण्यास मनाई केली आहे असे रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नवी दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या असून त्यावर देखरेख ठेवली जाईल आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती टाळण्यासाठी फलाटांवरील लोकांची संख्याही तपासली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

रेल्वे सुरक्षा दलाबरोबरच दिल्ली पोलीस आणि सरकारी रेल्वे पोलिसांनी स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अतिरिक्त पोलीस तैनात केले आहेत. शनिवारच्या चेंगराचेंगरीनंतरही रविवारी स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. हजारो प्रवाशांना रेल्वेगाडीत चढणे अवघड झाले होते. त्यानंतर सोमवारपासून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.

पाटणा स्थानकावरील गर्दी कायम

पाटणा रेल्वे स्थानकावर महाकुंभासाठी प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची गर्दी कायम आहे. प्रवाशांनी गच्च भरलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवासी जीवाचे रान करत असल्याचे दृश्य गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. दिल्लीतील दुर्घटना विचारात घेऊन तिथेही प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. तिकीट नसलेल्या प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जात नसल्याचे ‘ईसीआर’च्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘विनातिकीट प्रवासास मोदींचीच परवानगी’

बिहारमधून महाकुंभासाठी जाणारे अनेक प्रवासी विनातिकीट जात आहेत. बक्सर रेल्वे स्थानकावर तिकीट न काढताच प्रयागराजला जाणाऱ्या काही ग्रामीण महिलांना तेथील वरिष्ठ अधिकाऱ्याने अडवले असता, ‘‘आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच विनातिकिट प्रवास करायची परवानगी दिली आहे,’’ असा दावा या महिलांनी केला. त्यामुळे हे अधिकारी चांगलेच चकित झाले. दानापूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक जयंत कुमार आणि महिला यात्रेकरूंच्या संवादाची ध्वनिचित्रफित समाज माध्यमांवरही प्रसिद्ध झाली आहे.

कोणत्याही नकोशा घटना टाळण्यासाठी आम्ही बॅरिकेड लावले आहेत, गस्त वाढवली आहे आणि तत्काळ प्रतिसाद पथके तैनात केली आहेत. सीसीटीव्ही टेहेळणीही वाढवली आहे. नियंत्रण कक्ष गर्दीवर लक्ष ठेवून आहेत. – ‘आरपीएफ’ अधिकारी, नवी दिल्ली रेल्वे स्थानक

Story img Loader