अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारीसाठी अध्यक्ष बराक ओबामा यांनी हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, आतापर्यंत जनमत चाचण्यात क्लिंटन यांनी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी घेतली आहे. अध्यक्षपदाची उमेदवारी मिळालेल्या त्या पहिल्या महिला उमेदवार आहेत. हिलरी क्लिंटन या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. ओबामा यांनी माजी परराष्ट्रमंत्री क्लिंटन यांना पाठिंबा दिल्याचे त्यांच्या प्रचार समितीने सांगितले. आता येत्या १५ जूनला क्लिंटन यांच्या प्रचारमोहिमेत विस्कॉन्सिन येथे ओबामाही सहभागी होण्याची शक्यता आहे. ओबामा यांनी क्लिंटन यांचे प्रतिस्पर्धी असलेले बेर्नी सँडर्स यांची व्हाइट हाऊस येथे भेट घेतल्यानंतर क्लिंटन यांना पाठिंबा जाहीर केला. अध्यक्षीय प्रवक्त्याने सांगितले, की अध्यक्षीय शर्यतीत अजूनही निग्रही असलेले व्हेरमाँटचे सिनेटर सँडर्स यांना ओबामा यांच्या निर्णयाचे आश्चर्य वाटलेले नाही. सँडर्स हे अध्यक्षीय शर्यतीत अजून कायम आहेत व त्यांनी वॉशिंग्टन येथील पुढील मंगळवारच्या लढतीपर्यंत माघार घेणार नाही असे जाहीर केले आहे. सँडर्स यांनी पक्षाचे सदस्य म्हणून क्लिंटन यांना ट्रम्प यांच्या विरोधात पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सँडर्स पुढील आठवडय़ात माघार घेतील असे स्पष्ट झाले आहे. उपाध्यक्ष जो बिदेन यांनी सांगितले, की अमेरिकेचे अध्यक्ष कोण असावेत याबाबत आपले उत्तर हिलरी क्लिंटन असे आहे. बिदेन व सँडर्स यांचीही भेट झाली. त्यात बिदेन यांनी सँडर्स यांच्या अनेक मतदारांना पक्षाकडे आकर्षित केल्याबद्दल अभिनंदन केले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी क्लिंटन यांना पाठिंबा दिला आहे. क्लिंटन या ट्रम्प यांच्यापेक्षा तीन टक्क्यांनी आघाडीवर असून, जनमत चाचणीत क्लिंटन यांना ४२ टक्के तर ट्रम्प यांना ३९ टक्के मते मिळालेली दिसतात. ट्रम्प यांची लोकप्रियता ६ टक्क्यांनी कमी झाली आहे. अमेरिकी काँग्रेसचे भारतीय वंशाचे सदस्य अमी बेरा यांनी सांगितले, की क्लिंटन या पुढील अध्यक्ष असतील. ओबामा यांनी क्लिंटन यांना पाठिंबा दिल्याने ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
अध्यक्षीय उमेदवारीसाठी ओबामांचा क्लिंटन यांना पाठिंबा
अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारीसाठी अध्यक्ष बराक ओबामा यांनी हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा दिला
First published on: 11-06-2016 at 02:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President barack obama endorses hillary clinton