US Airstrike On ISIS In Somalia : गेल्या महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांंनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये त्यांनी आता दहशतवादाविरोधातही आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी रात्री घोषणा केली की, अमेरिकन सैन्याने सोमालियातील आयसिसच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत, ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रुथ सोशलवर पोस्ट

ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, “आज सकाळी मी सोमालियामध्ये आयसिसच्या एका वरिष्ठ हल्लेखोरावर आणि त्याने भरती केलेल्या दहशतवाद्यांवर लष्करी हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते. हे दहशतवादी गुहांमध्ये लपले होते, पण आम्ही त्यांच्यावर अचूक हल्ला केला. ते अमेरिका आणि आमच्या मित्र राष्ट्रांसाठी धोकादायक होते.

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे स्पष्ट केले की, “अमेरिकेने हवाई हल्ल्यांनी, ज्यामध्ये दहशतवादी लपले होते त्या गुहा उद्ध्वस्त केल्या आहेत. नागरिकांना कोणतीही हानी न पोहोचवता अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.”

शोधून शोधून मारू

“आमच्या सैन्याने गेल्या अनेक वर्षांपासून या आयसिस हल्ल्यांचे नियोजन करणाऱ्याला लक्ष्य केले आहे, परंतु बायडेन आणि त्याच्या साथीदारांनी हे काम पूर्ण करण्यासाठी पुरेशी जलद कारवाई केली नाही. मी केली! अमेरिकन लोकांवर हल्ला करणाऱ्या आयसिस आणि इतर सर्वांना संदेश आहे की, आम्ही तुम्हाला शोधून शोधून मारू”, असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.

दरम्यान, संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले की, “अमेरिकन सैन्याच्या आफ्रिका कमांडने केलेले हल्ले ट्रम्प यांनी निर्देशित केले होते आणि यासाठी सोमालिया सरकारशी समन्वय साधला होता.” पेंटागॉनच्या (अमेरिकन संरक्षण विभाग) सुरुवातीच्या अंदाजानुसार, या हल्ल्यांमध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. पेंटागॉनने असेही म्हटले आहे की, त्यांच्या मूल्यांकनानुसार, या हल्ल्यांमध्ये कोणत्याही नागरिकाचे नुकसान झाले नाही.

यापूर्वी सीरियामध्ये अमेरिकेची कारवाई

शनिवारी सोमालीयात कारवाई करण्यापूर्वी, ३० जानेवारी रोजी वायव्य सीरियामध्ये अमेरिकन सैन्याच्या हवाई हल्ल्यात हुर्रस अल-दीनचा एक अव्वल दहशतवादी मारला गेला. हुर्रस अल-दीन हा अल-कायदाशी संबंधीत गट आहे. यूएस सेंट्रल कमांडने याला दुजोरा दिला आहे.

Story img Loader