Druapadi Murmu on Deepseek : डीपसीक या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील चीनच्या कंपनीने अमेरिकन कंपन्यांच्या तुलनेत कमी खर्चात एआय मॉडेल विकसित केल्याने अमेरिकन कंपन्यांची झोप उडाली आहे.यादरम्यान, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आज भारत डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक प्रमुख जागतिक खेळाडू म्हणून आपले अस्तित्व निर्माण करत आहे. जगातील विकसित राष्ट्रे देखील भारताच्या UPI व्यवहार प्रणालीच्या यशाने आश्चर्यचकित झाले आहेत. सामाजिक न्याय आणि समानतेसाठी भारत सरकारने डिजिटल तंत्रज्ञानाचा एक साधन म्हणून वापर केला आहे. भारत सरकार सायबर सुरक्षेमध्ये कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी सतत काम करत आहे. डिजिटल फसवणूक, सायबर गुन्हे आणि डीपफेक ही सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर आव्हाने आहेत, असं द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प पूर्ण झाला असून आता काश्मीर ते कन्याकुमारी या रेल्वेमार्गाने देश जोडला जाईल. विमान कंपन्यांनी १७०० नवीन विमानांची ऑर्डर दिल्याने देशातील विमान वाहतूक क्षेत्र वेगाने प्रगती करत आहे. भारताच्या मेट्रो रेल्वे नेटवर्कने आता १००० किलोमीटरचा टप्पा ओलांडला आहे. भारताकडे जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क आहे, असंही द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

मध्यमवर्गीयांना स्वतःचं घर घेण्यासाठी सरकार कटिबद्ध

सर्व नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी देशात १.७५ लाख ‘आरोग्य मंदिर’ स्थापन करण्यात आले आहेत. कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता अनेक कर्करोगाच्या औषधांवरील सीमाशुल्क रद्द करण्यात आले आहे. सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आवास उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. या योजनेंतर्गत आणखी ३ कोटी घरे देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मध्यमवर्गीयांचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे सरकार कटिबद्ध आहे, असं आश्वासन त्यांनी दिलं.

“जागतिक अनिश्चिततेच्या युगात, भारत आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्थिरतेचा पाया बनून जगासमोर एक उदाहरण निर्माण करत आहे. G7 शिखर परिषद असो, क्वाड, BRICS, SCO किंवा G20 असो, संपूर्ण जगाने भारताच्या क्षमता, धोरणे आणि हेतूंवर विश्वास दाखवला आहे. आपण पुन्हा एकदा एकतेच्या संकल्पाचा पुनरुच्चार करूया आणि भारताची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होऊया”, असं आवाहन त्यांनी केलं.

“आपल्या भावी पिढ्यांना २०४७ मध्ये एक विकसित, मजबूत, सक्षम आणि समृद्ध भारत नक्कीच दिसेल,” असे राष्ट्रपती मुर्मू यांनी भाषणाचा समारोप करताना म्हटले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President draupadi murmu speech in budget session 2025 on deepseek sgk