राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा २५ जुलै रोजी शपथग्रहण सोहळा नियोजित आहे. अध्यात्मिक बैठक असणाऱ्या मुर्मू यांनी या शपथग्रहण सोहळ्यावेळी राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात येणारे स्नेहभोजन शुद्ध शाकाहारी ठेवावे, अशी मागणी शाकाहारचे पुरस्कर्ते व सर्वजीव मंगल प्रतिष्ठानणचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली. या मागणीचे निवेदन ई मेलद्वारे राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले की, राष्ट्रपतींच्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेते मंडळींसाठी शाही भोजन आयोजिले जाते. शाकाहार आणि अहिंसा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा वारसा आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे शुद्ध शाकाहारी आहेत. शाकाहाराचे महत्व करोना काळाताही अधोरेखित झाले आहे. त्यामुळे शाकाहार जगभरात पोहचवण्यात मदत व्हावी, यासाठी राष्ट्रपती भवनातील भोजन केवळ शाकाहारी असावे, मांसाहार वर्ज्य करावा.
पाहा व्हिडीओ –
जर्मनी सरकारने सगळ्या शासकीय समारंभात शाकाहारी भोजन अनिवार्य केले –
तसेच, “भारतातील विविध भागांत अनेक लोकप्रिय आणि स्वादिष्ट पदार्थ आहेत. त्यांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. विदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना आपल्या येथील स्वादिष्ट पदार्थांची चव चाखायला द्यायला हवी. महत्वाची बाब म्हणजे जर्मनी सरकारने सगळ्या शासकीय समारंभात शाकाहारी भोजन अनिवार्य केले आहे. तेथील तत्कालीन पर्यावरण मंत्री बार्बरा हैड्रिक्स यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये हा निर्णय घेतला. ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण हानी याला मांसाहार कारणीभूत आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन शाकाहाराचा पुरस्कार करावा. तसेच आपल्या देशात असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर, मांस निर्यातीवर बंदी घालण्यात यावी,” अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.