भाजपचे अध्वर्यू, माजी उपपंतप्रधान आणि राम मंदिर आंदोलनाच्या प्रमुख नायकांपैकी एक असलेले लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय षटकार लगावला होता. त्यानंतर आज मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः अडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. उपराष्ट्रपदी जगदीप धनखडही यावेळी उपस्थित होते. प्रकृतीच्या कारणास्तव लालकृष्ण अडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याचा उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे मोदी आणि द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला.
शनिवारी (३० मार्च) राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात चार दिग्गजांना मरणोत्तर भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर आणि कृषी क्षेत्रातील संशोधक एमएस स्वामीनाथन यांचा समावेश आहे. नरसिंह राव यांचे पुत्र पी. व्ही. प्रभाकर राव, चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत चौधरी, कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर आणि एमएस स्वामीनाथ यांची कन्या नित्या राव यांना राष्ट्रपतींनी सन्मानित केलं.
८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराचीत जन्म झालेले अडवाणी १९४२ साली रा.स्व. संघात आले. देशाच्या फाळणीनंतर १९४७ साली ते सिंध प्रांतातून दिल्लीला स्थलांतरित झाले. १९५७ च्या सुरुवातीला त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह जनसंघाच्या खासदारांना त्यांच्या संसदीय कामकाजात मदत करण्यास सुरुवात केल्याने त्यांचा मुख्य राजकीय प्रवाहात प्रवेश झाला. १९५८ साली अडवाणी दिल्ली प्रदेश जनसंघाचे सचिव बनले. या भूमिकेशिवाय, १९६० साली त्यांनी ‘ऑर्गनायझर’ या नियतकालिकात सहायक संपादकपद स्वीकारल्याने पत्रकार म्हणून त्यांच्या जीवनाचा नवा अध्यायही सुरू झाला. मात्र हा कार्यकाळ खूप काळ टिकला नाही, कारण १९६७ साली पूर्णवेळ राजकारणात येण्यासाठी त्यांनी हे पद सोडले. १९७० साली ते राज्यसभेवर निवडून आले. दीर्घ राजकीय कारकीर्दीत अडवाणी यांनी उपपंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांसह पक्ष आणि सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली. जनता पक्ष सरकारच्या पतनानंतर अडवाणी यांनी वाजपेयी यांच्यासह भाजपला रा.स्व. संघाची राजकीय शाखा म्हणून प्रस्थापित करण्यात मदत केली. राम मंदिराच्या मागणीसाठी आडवाणी यांनी देशभर रथयात्रा काढली होती. या रथयात्रेमुळे आडवाणी देशभर लोकप्रिय झाले.
मोदींच्या कार्यकाळात भारतरत्न कुणाकुणाला?
नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसचे एकेकाळचे अध्यक्ष मदन मोहन मालवीय, माजी पंतप्रधान आणि भाजपा नेते अटल बिहारी वाजपेयी, माजी राष्ट्रपती आणि काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी, आसामी गायक आणि संगीतकार भूपेन हजारिका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते नानाजी देशमुख यांचा समावेश आहे. मालवीय आणि वाजपेयी यांना हा सन्मान २०१५ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्याच्या वर्षभरात मिळाला.