President Droupadi Murmu On Crimes Against Women : देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली होती. तसेच बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण पुढं आलं होतं. याशिवाय इतरही राज्यातून अशाच प्रकारच्या घटना पुढे आल्या आहेत. या घटनांनंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे. देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या घटनांवर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाल्या राष्ट्रपती मुर्मू?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. कोलकाता येथील घटना वेदनादायक आणि भयावह आहे. बस आता खूप झालं. ज्यावेळी कोलकाता येथे विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत होते, तेव्हा या प्रकरणातील आरोपी खुलेआम फिरत होते, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

हेही वाचा – Nabanna March Kolkata : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधातील आंदोलन चिघळले, पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर!

“समाजाला प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करण्याची गरज”

पुढे बोलताना, कोणताही सुसंस्कृत समाज मुलींवर अशाप्रकारे अत्याचार होऊ देऊ शकत नाही. समाजाला आता प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. नागरिकांनी स्वत:ला कठीण प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. १२ वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणानंतर अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. मात्र, समाजाने याकडे दुर्लक्ष केलं. आपल्या समाजाला सामूहिक स्मृतिभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसून येते, या संकटाचा आपण सर्वांनी मिळून सामना केला पाहिजे, अशी प्रतिक्रियाही राष्ट्रपतींनी दिली.

कोलकाता येथील प्रकरण काय?

९ ऑगस्टला एक महिला डॉक्टर आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या ( R.G. Kar Hospital ) सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळली. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला असल्याची बाब समोर आली. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावर अनेक जखमा ( Kolkata Rape and Murder ) होत्या. तिच्या डोळ्यांमधूनही रक्त वाहात होतं. ही घटना समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. नागरिक रस्तावर उतरले. या मुलीला न्याय दिला पाहिजे, अशी नागरिकांनी केली. दरम्यान, याप्रकरणी आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा – Kolkata Rape and Murder : “सोनागाछीला येऊन तुमची शारिरीक भूक भागवा, पण बलात्कार..”; कोलकात्यातील देहविक्री करणाऱ्या महिलांचं आवाहन

बदलापूरमध्येही चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार

कोलकाता येथील प्रकरण उजेडात येत नाही, तोच काही दिवसांनंतर महाराष्ट्रातील बदलापूर येथे शाळेतल्या कर्मचाऱ्याने चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकील आलं होतं. याप्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले होते. याप्रकरणातील आरोपीला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President droupadi murmu statement on kolkata doctor rape murder case crimes against women spb