राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये शिवसेना सहभागी होत आहे. शिवसेनेच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई या बैठकीत सहभागी होणार आहेत. नवी दिल्ली येथे दुपारी तीनच्या सुमारास कॉन्स्टिट्युशन क्लब येथे ही बैठक होणार आहे. यासाठी शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून देसाई मुंबईहून नवी दिल्लीला रवाना झाले आहेत.

नक्की वाचा >> “मुख्यमंत्री म्हणतील, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती मग जिंकायची गरज काय? आजपासून…”; शरद पवारांच्या उमेदवारीवरुन खोचक टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी दिल्लीत येऊन दाखल झाल्यानंतर, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या उमेदवार निवडीला वेग आला आहे. यासंदर्भात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी यांनी पवार यांची मंगळवारी संध्याकाळी दिल्लीतील निवासस्थानी भेट देऊन सविस्तर चर्चा केली. उमेदवार निश्चितीसंदर्भात आज विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावण्यात आली असून त्यामध्ये आता काँग्रेससहीत शिवसेनाही सहभागी होणार असल्याने विरोधकांना अधिक बळ मिळणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या अयोध्या दौऱ्यावर असल्याने सुभाष देसाई शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे आणि शरद पवार यांनी या विषयावर चर्चा करुन विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी बैठक घेणार असल्याचं जाहीर केलेलं.

पवारांच्या घरी नेत्यांच्या भेटीगाठी
पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी दिवसभर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होत होत्या. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी पवार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी संजय सिंह यांनी मुंबईत पवारांची भेट घेतली होती व सर्वसंमतीने पवारांच्या उमेदवारीला ‘आप’ पाठिंबा देईल असेही स्पष्ट केले होते.

पवारांचा नकार, पर्यायाचा शोध
विरोधकांचा सहमतीचा उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव सुचवण्यात आले असले तरी, पवारांनी हा पर्याय फेटाळला आहे. राष्ट्रपती पदासाठी पवार उभे राहण्यास तयार नसल्याने अन्य नावांचा विचार केला जात असून पवारांच्या निवासस्थानी मंगळवारी झालेल्या बैठकांमध्ये संभाव्य नावांची चर्चा झाल्याचे समजते. काँग्रेसने पवारांच्या नावाला पाठिंबा दिला होता. मात्र, नितीश कुमार व गुलाम नबी आझाद यांच्या नावाचीही चर्चा केली जात आहे. त्यापैकी आझाद यांचे नाव काँग्रेसला मान्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे संभाव्य नावांवर खल केला जात आहे. शरद पवार मंगळवारी दिल्लीत दाखल जाल्यापासून यासंदर्भातील घडामोडींना वेग आल्याचं चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी यांनीही पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. आज या चर्चेत काँग्रेसही सहभागी होणार आहे.

तृणमूलची आघाडी, काँग्रेसची आधी नाराजी मग होकार…
राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असतानाही तृणमूल काँग्रेसने वेगवान हालचाली करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, द्रमुक, आप, शिवसेना यांच्यासह अन्य प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहून दिल्लीमध्ये बुधवारी कॉन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. तृणमूल काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेवर काँग्रेस, माकप, द्रमुक आदी पक्षांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे हे पक्ष बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याचे मानले जात होते. मात्र, काँग्रेसने ममतांच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला काँग्रेसच्या वतीने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी खरगे यांना अन्य पक्षांशी समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवली आहे.

भाजपाकडे २० हजार मतमूल्यांची कमतरता
राष्ट्रपती पदाचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजपकडे सुमारे २० हजार मतमूल्यांची कमतरता असून बिजू जनता दल व वायएसआर काँग्रेस या दोन पक्षांच्या मदतीने हा टप्पा पार करणे भाजपसाठी कठीण नाही. तरीही विरोधी पक्षांनी महाआघाडीचा सहमतीचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विरोधकांची २०२४ मधील लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी मानली जात आहे.

निवडणुकीचं राजकीय समिकरण
सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधक या दोघांनीही त्यांच्या उमेदवाराचे नाव अद्याप घोषित केले नाही. त्यामुळे या निवडणुकीविषयीची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. आकड्यांच्या समीकरणात ४८% मते असलेला एनडीएचा उमेदवार हा शर्यतीत सर्वात पुढे असणार आहे. ओडिसातील बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी यांसारख्या मित्रपक्षांच्या साथीने एनडीएच्या उमेदवाराचा विजय सोपा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष मात्र राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध न होता गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही लढत व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसतर्फे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत.

निवडणूक कधी?
निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ जून असणार आहे. १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, “आयोगाने मतदानाच्या दिवशी कोविड प्रोटोकॉल पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२३१ आहे, तर खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२०० आहे. दोन्ही मतदारांच्या मतांचे एकूण मूल्य १०,८६,४३१ आहे. खासदारांच्या एका मताचे मूल्य ७०० आहे. खासदारांना संसद भवनात मतदान करणे बंधनकारक असणार आहे. तर आमदाय त्यांच्या त्यांच्या राज्यात विधानभवनात मतदान करतील.

Story img Loader