नवी दिल्ली : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला वेग येणार असून काँग्रेससह विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठका दिल्लीत होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील सत्तेच्या बळावर भाजपने राज्यसभेतील संख्याबळ कायम राखण्यात यश मिळवले आहे. तसेच, ‘वायएसआर काँग्रेस’सारख्या जवळीक साधणाऱ्या प्रादेशिक पक्षांच्या संख्याबळात झालेली वाढ भाजपसाठी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फायद्याची ठरणार आहे.

राज्यसभेत रिक्त झालेल्या ५७ जागांमध्ये भाजपचे २४ सदस्य निवृत्त झाले होते. या निवडणुकीत भाजपला २० जागा मिळण्याची शक्यता होती मात्र, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ‘चाणक्य’नीतीमुळे भाजपला दोन जागा जास्त मिळाल्या. त्यामुळे राज्यसभेतील भाजपचे संख्याबळ ९३ झाले असून पक्षाची ताकद दोन जागांनी कमी झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी भाजपला मित्रपक्षांच्या सुमारे २० हजार मतमूल्यांची गरज आहे. ‘वायएसआर काँग्रेस’चे राज्यसभेतील संख्याबळ तीन सदस्यांनी वाढून ९ झाले असून भाजपचा आणखी एक मित्रपक्ष बिजू जनता दलाने ९ सदस्यांचे संख्याबळ कायम राखण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या विजयाची फारशी चिंता भाजपला करावी लागणार नसल्याचे राज्यसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

रिक्त होणाऱ्या नऊही जागा काँग्रेसला जिंकण्यात यश मिळाल्याने राज्यसभेत काँग्रेसचे संख्याबळ २९ झाले आहे. पण, वरिष्ठ सभागृहातील काँग्रेसची ताकद झपाटय़ाने कमी होत गेली असून आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद, कपिल सिबल यांच्यासारखे वक्तेही काँग्रेसने गमावले आहेत. त्यामुळे राज्यसभेत काँग्रेसच्या तुलनेत प्रादेशिक पक्षांना अधिक महत्त्व येण्याची शक्यता दिसू लागली आहे. पंजाबमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील खासदारांनी संख्या आठने वाढली असून ‘आप’चे संख्याबळ १० वर पोहोचलेले आहे. शिवाय, तृणमूल काँग्रेस (१३), द्रमुक (१०), राष्ट्रीय जनता दल (६) अशा भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांचीही ताकद वाढलेली आहे. त्यामुळे काँग्रेसला या प्रादेशिक पक्षांना विश्वासात घेऊनच राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्चित करावा लागणार आहे.

सोनियांकडून खरगे यांच्यावर जबाबदारी

विरोधी पक्षांशी समन्वय साधण्याची जबाबदारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुंबई दौऱ्यावर असणाऱ्या खरगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा केली असली तरी, पवार दिल्लीत आल्यानंतरच या हालचालींना वेग येणार आहे. काँग्रेस तसेच, भाजपविरोधात भूमिका घेणाऱ्या ‘आप’शीही संपर्क साधण्याची सूचना सोनियांनी खरगे यांना केली आहे. तृणमलू काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी व द्रमुकचे प्रमुख स्टॅलीन, माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांच्याशी सोनियांनी संवाद साधला आहे.

ममता बॅनर्जी यांचा पुढाकार; दिल्लीत १५ जून रोजी विरोधकांची बैठक

राष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर विचार करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशभरातील विरोधी पक्षनेत्यांची बैठक १५ जून रोजी दिल्लीत आयोजित केली आहे. ही बैठक नवी दिल्लीतील कॉन्स्टिटय़ूशन क्लबमध्ये होईल. तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. या बैठकीत सहभागी होण्याबाबतचे पत्र बॅनर्जी यांनी प्रमुख विरोधी पक्षांना लिहिले आहे. यात डावे पक्ष तसेच बिगरभाजपशासित राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. 

तृणमूल काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आगामी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लक्षात घेता बॅनर्जी यांनी देशातील विभाजनवादी शक्तींच्या विरोधात प्रबळ आणि सक्षम पर्याय उभा करण्याच्या हेतूने भाजपविरोधी पक्षांचे मुख्यमंत्री आणि नेते यांच्याशी संपर्क साधला आहे. ही संयुक्त बैठक नवी दिल्लीत १५ जून रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केली आहे. 

बॅनर्जी यांनी पत्र लिहिलेल्यांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, तमिळनाडूचे मुख्यमंत्री थिरू एम. के. स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रालोदचे अध्यक्ष जयंत चौधरी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला, पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष एस. सुखबिरसिंग बादल, सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे अध्यक्ष पवन चामिलग, आययूएमएलचे अध्यक्ष के. एम. कादर मोहिदीन यांचा समावेश आहे.

लोकशाही घट्ट रुजलेल्या आपल्या देशात मजबूत आणि प्रभावी विरोधी पक्षाची गरज आहे. आज देशाला झाकोळून टाकू पाहणाऱ्या विभाजनवादी शक्तींना रोखण्यासाठी सर्व पुरोगामी शक्तींनी एक होण्याची ही वेळ आहे. केंद्रीय यंत्रणांकडून विरोधी नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर डागाळली जात आहे. देशात कटुता निर्माण केली जात आहे. त्याच्याविरोधात ठामपणे उभे राहण्याची ही वेळ आहे.  

– ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष

Story img Loader