अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला जगण्यासाठीचा संघर्ष आख्खं जग उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. या संघर्षामध्ये स्थानिक अफगाणी नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. तालिबान्यांनी अंमल प्रस्थापित केल्यामुळे अफगाणी नागरिकांना, विशेषत: महिलांना असलेल्या अधिकारांची गळचेपी होत असल्याचं दृश्य संपूर्ण जगासमोर उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर काबूल विमानतळावर जीव वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने पळणारे अफगाणी आणि इतर देशांमधील नागरिक पाहून उभ्या जगाचं मन दु:खी झालं. अशीच काहीशी परिस्थिती जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची झाली. शुक्रवारी व्हाईट हाऊसवरून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीविषयी आपली भूमिका मांडली आहे.
आत्तापर्यंत १८ हजार नागरिकांना केलं एअरलिफ्ट!
अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेली एअरलिफ्ट मोहीम अर्थात तिथल्या अमेरिकी नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम ही इतिहासातल्या सर्वात कठीण एअरलिफ्ट मोहिमांपैकी एक असल्याचं बायडेन यावेी म्हणाले आहेत. अमेरिकेने गेल्या दीड महिन्यात तब्बल १८ हजार नागरिकांना अफगाणिस्तानमधून सुखरुप अमेरिकेत आणलं आहे. यामधले १३ हजार नागरिक १४ ऑगस्टनंतर सुरू झालेल्या एअरलिफ्ट मोहिमेअंतर्गत परत आणण्यात आले आहेत, अशी माहिती देखील जो बायडेन यांनी दिली.
“…त्यांना कळत नाहीये पुढे काय होणार!”
दरम्यान यावेळी बोलताना जो बायडेन यांनी काबूल विमानतळावरील दृष्य वेदनादायी होती, असं म्हटलं आहे. “गेला आठवडा मन हेलावून टाकणारा होता. काबूलमध्ये हवालदील झालेल्या नागरिकांची देशाबाहेर पडण्यासाठी आटापिटा करणारी दृश्य काळीज पिळवटून टाकणारी होती. ते घाबरले आहेत, दु:खी आहेत. त्यांना कळत नाहीये की यानंतर आता पुढे काय होणार आहे”, अशा शब्दांत जो बायडेन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
We have almost 6,000 troops on the ground providing runway security & to the mountain division standing guard around the airport (in Kabul, Afghanistan) & marine assisting civilian departure. This is one of the largest & most difficult airlifts in history: US President Joe Biden
— ANI (@ANI) August 20, 2021
“ज्यांना कुणाला घरी यायचंय, त्यांना…”
यावेळी बोलताना राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या अमेरिकी नागरिकांना दिलासा दिला आहे. “सध्या अफगाणिस्तानमधून अमेरिकी सरकारने पुरवलेल्या खासगी विमानांमधून देखील हजारो अमेरिकी नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना बाहेर काढलं जात आहे. ज्या अमेरिकन नागरिकांना पुन्हा आपल्या घरी परतायची इच्छा आहे, त्या सगळ्याना सरकार बाहेर काढणार”, असं बायडेन म्हणाले आहेत.
“..तर खबरदार, सडेतोड उत्तर देऊ”, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचा तालिबान्यांना इशारा!
टीका करायला भरपूर वेळ असणार आहे…
दरम्यान, अफगाणिस्तानमधून फौजा माघारी घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावरून होत असलेल्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिलं आहे. “एकदा ही मोहीम संपली, की टीका करण्यासाठी आणि दुसरी मतं ऐकून घेण्यासाठी भरपूर वेळ असेल. पण आत्ता माझं पूर्ण लक्ष हे काम (अफगाणिस्तानमधून अमेरिकी नागरिकांना सुखरूप परत आणणं) पूर्ण करून घेण्यावर केंद्रीत आहे”, असं ते म्हणाले.
Since I spoke on Monday, we have made significant progress on the ground in Afghanistan. pic.twitter.com/BDtK9kRHeb
— President Biden (@POTUS) August 21, 2021
“..तर खबरदार, सडेतोड उत्तर देऊ”
दरम्यान, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये बायडेन यांनी तालिबान्यांना कठोर इशारा दिला आहे. “आम्ही तालिबान्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की आमच्या फौजा किंवा काबूल विमानतळावर सुरू असलेलं बचावकार्य यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला केलात, तर त्याला तितक्यात तीव्रतेनं आणि सडेतोड उत्तर दिलं जाईल”, असं बायडेन म्हणाले आहेत.