पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिकेतील राजकीय संबंध दृढ झाले आहेत. या काळात दोन्ही देशांच्या पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांनी परस्पर देशांचे अनेक दौरे केले आहेत. दरम्यान आता अशी बातमी मिळाली आहे की, अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेच्या राजकीय भेटीसाठी आमंत्रित केलं आहे. असं म्हटलं जात आहे की, भारताने हे आमंत्रण स्वीकारलं आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांचे अधिकारी या दौऱ्याबद्दल चर्चा करत आहेत. तसेच भेटीची तारीख निश्चित करण्याबद्दल देखील चर्चा सुरू आहेत, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
मोदींच्या अमेरिका भेटीबाबतची तयारी अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. ही राजकीय भेट महत्त्वाची आहे कारण, भारत यावर्षी जी-२० ग्रुपशी संबंधित अनेक प्रमुख कार्यक्रमांचं आयोजन करत आहे, यामध्ये सप्टेंबरमधील शिखर संमेलनाचा देखील समावेश आहे. यामध्ये देशातील अनेक मोठे नेते आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन देखील सहभागी होतील.
मोदी कधी जाणार अमेरिका भेटीवर?
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशांचे अधिकारी जूनमध्ये मोदींच्या अमेरिका भेटीचं आयोजन करण्यावर विचार करत आहेत. जुलै महिन्यात युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह (अमेरिकेतील प्रतिनिधी सभा) आणि सिनेट या दोन्ही सभागृहांची सत्र होणार आहेत. तर मोदी देखील या काळात भारतात व्यस्त असतील. त्यामुळे जून महिन्यात मोदी अमेरिका भेटीवर जाऊ शकतात.
हे ही वाचा >> मोठी स्वप्ने पूर्ण करणारे निर्भय सरकार! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषणात कौतुकोद्गार
या अमेरिका भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएस काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. तसेच यावेळी व्हाईट हाऊसमधील डिनरचा (संध्याभोज) समावेश असेल. यावर्षी जी-२० संमेलनाव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप व्यस्त असणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस देशातल्या अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या काळात मोदी त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्यात व्यस्त असतील. तसेच अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामं असतील.