प्रसिद्ध लेखिका, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सुधा मूर्ती यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच या निवडीबाबत आनंद व्यक्त केला. दरम्यान, राज्यसभेवर निवड झाल्यानंतर सुधा मूर्ती यांनी म्हटलं आहे की, त्या सध्या भारतात नाहीत. परंतु, महिला दिनानिमित्त त्यांना मिळालेली ही मोठी भेट आहे. देशासाठी काम करण्यासाठी एक नवीन जबाबदारी मिळाली आहे. मूर्ती यांनी या निवडीबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड केल्याचा मला खूप आनंद झाला आहे. सामाजिक कार्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधा मूर्ती यांनी अतुलनीय आणि प्रेरणादायी योगदान दिलं आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती हा आपल्या नारी शक्तीचा एक सशक्त पुरावा आहे. आपल्या देशाचं भवितव्य घडवण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. सुधा मुर्ती यांची राज्यसभेतील उपस्थिती महिलांची ताकद आणि क्षमता दर्शवते. यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी मी सुधा मूर्ती यांना शुभेच्छा देतो.

सुधा मूर्ती यांनी तीन महिन्यांपूर्वी नव्या संसद भवनाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी संसदेच्या दोन्ही इमारती पाहिल्या. त्यानंतर त्या म्हणाल्या, “ही इमारत खूपच सुंदर आहे. मला प्रदीर्घ काळापासून या ठिकाणी भेट द्यायची होती आणि आज तो योग आला” दरम्यान, त्यावेळी मूर्ती यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्ही राजकारणात यायचा विचार केला आहे का? यावर सुधा मूर्ती म्हणाल्या, मी जिथे आहे तिथे खुश आहे. मला राजकारणात वगैरे मुळीच यायचं नाही.

कोण आहेत सुधा मूर्ती?

सुधा मूर्ती इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. तसेच त्या लेखिका म्हणूनही जगभर प्रसिद्ध आहेत. सुधा मुर्ती या महिला आणि लहान मुलांसाठी काम करत आहेत. त्यांची संस्थादेखील यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये काम करतेय.

सुधा मूर्ती यांचे पती नारायण मूर्ती यांनी १९८१ मध्ये इन्फोसिसची स्थापना केली होती. त्यासाठी सुरुवातीच्या काळात सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्ती यांना १०,००० रुपये उधार दिले होते. सुरुवातीच्या काळात मुर्ती दाम्पत्य एका छोट्याशा घरात भाड्याने राहत होते. त्या काळात त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. आज त्यांची इन्फोसिस ही देशातली दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. त्याचबरोबर जगभरातल्या नावाजलेल्या आयटी कंपन्यांमध्ये इन्फोसिसचं नाव घेतलं जातं. इन्फोसिसमध्ये ३ लाखांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. मूर्ती यांच्या मुलाचीही स्वतःची स्वतंत्र कंपनी आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुलीचा इंग्लंडमध्ये मोठा व्यवसाय आहे. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक हे मूर्ती यांचे जावई आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President murmu nominates sudha murthy to rajya sabh says pm narendra modi asc