जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची मोबाइलवरून होणारी संभाषणे ‘टॅप’ केली जात असल्याची अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पूर्ण माहिती होती. इतकेच नव्हे तर २०१० मध्येच जेव्हा त्यांना याबद्दल सांगण्यात आले तेव्हा त्यांनी ही ‘हेरगिरी’ थांबविण्याच्या कोणत्याही सूचना तर दिल्या नाहीतच, उलट ती हेरगिरी सुरूच ठेवण्याचे आदेश दिले होते, असा गौप्यस्फोट जर्मनीतील ‘बिल्ड अ‍ॅन सोन्तॅग’ या आघाडीच्या वृत्तपत्राने केला आहे.
या वृत्तामुळे जगभर खळबळ उडाली असून अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय संरक्षण संस्थेच्या’(एनएसए) टेहळणी कार्यक्रमाभोवती पुन्हा एकदा संशयाचे काळे ढग जमा झाले आहेत. मर्केल यांच्या मोबाइल टॅपिंगची माहिती अध्यक्ष ओबामा यांना २०१० मध्येच एनएसएचे संचालक कीथ अ‍ॅलेक्झांडर यांनी दिली होती, अशी माहिती एनएसएमधीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने उघड केली असल्याचा दावा सदर वृत्तपत्राने केला आहे. शिवाय अँजेला मर्केल यांच्या संभाषणांवरून एक ‘अहवाल’ तयार करण्याच्या सूचनाही व्हाइट हाऊसमार्फत देण्यात आल्या होत्या, असेही या वृत्तात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष बाब..
मर्केल या सुरक्षिततेच्या करणास्तव टॅपिंग करता येणार नाही, असा मोबाइल वापरत होत्या. मात्र एनएसएने या मोबाइलचे सर्व कोड ‘क्रॅक’ केले आणि संभाषणांचे ध्वनिमुद्रण केले. हे ध्वनिमुद्रण २००२ पासून सुरू होते. मात्र मर्केल यांच्या कार्यालयातील ज्या फोनवरून त्या जगभरातील सर्व नेत्यांशी संपर्क साधत असत, त्या फोनवरील संभाषणांचे मात्र ध्वनिमुद्रण करण्यात आलेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हे कशासाठी?
जर्मनीच्या चॅन्सेलर मर्केल यांच्या भूमिकांबाबत ओबामा यांच्या मनात संशयाची भावना होती आणि त्यामुळेच त्यांनी या सूचना दिल्या होत्या, असा दावा एनएसएच्या एका अधिकाऱ्याने आपले नाव गोपनीय राखण्याच्या अटीवर केला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या या आदेशाचे पालन करीत मर्केल यांनी त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना केलेल्या प्रत्येक कॉलचे ध्वनिमुद्रण करण्यात आले, अशी माहितीही वृत्तपत्राने दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President obama knew about nsas spying on merkel report
Show comments