प्रगत तंत्रज्ञानाचा वापर व शेतीमालासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून कृषी क्षेत्राचा विकास साधण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषी बाजारपेठेत क्रांती आणू, असे आश्वासन मुखर्जी यांनी भाषणादरम्यान दिले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने आज, सोमवारी झाली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या भाषणात राष्ट्रपतींनी आर्थिक सुधारणा, कृषी, ऊर्जा, पायाभूत सुविधांवर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत केलेल्या आश्वासनांची जंत्रीच वाचून दाखवली. जमीन अधिग्रहण कायद्याचा संदर्भ देत या  प्रक्रियेत सुसूत्रता येण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रपतींनी दिले. भाषणात नावीन्याचा अभाव होता, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व बसपच्या नेत्या मायावती यांनी दिली.
राष्ट्रपती म्हणाले की, जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पारदर्शी व जलदगतीने होण्यासाठी हा कायदा आहे. ग्रामविकास, पायाभूत सुविधांची उभारणी, शाळा, रुग्णालये उभारण्यासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी कायदा तयार करताना योग्य विचार केला गेला आहे. दळणवळणासाठी बंदरे, रस्ते व रेल्वेचे जाळे विस्तारणार असल्याचे राष्ट्रपती मुखर्जी यांनी सांगितले. सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे महागाईचा दर कमी झाला असून अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे. सामान्यांना आर्थिक हक्क देणाऱ्या जनधन योजनेंतर्गत देशभरात १३.२ कोटी बँक खाती सुरू झाली आहेत. देशातील एकूण एलपीजीधारक ग्राहकांपैकी तब्बल ७५ टक्के ग्राहकांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होते. लाभार्थ्यांच्या खात्यात थेट सरकारी मदत जमा करण्यात येणारी ही जगभरातील सर्वात मोठी योजना असल्याचे मुखर्जी म्हणाले.
    
नावीन्याचा अभाव;विरोधकांचे टीकास्त्र
राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नावीन्याचा अभाव असल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. त्या म्हणाल्या की, राष्ट्रपतींनी उल्लेख केलेली विकासकामे काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारचा कार्यक्रम होता. बसप अध्यक्षा मायावती यांनी राष्ट्रपतींच्या भाषणात काहीही नवीन नसल्याची टीका केली. केंद्र सरकारची अवस्था म्हणजे जास्त बोलणे व काम कमी अशी आहे. त्याचेच प्रतिबिंब राष्ट्रपतींच्या भाषणात उमटले. लोकसभा निवडणुकीपूवी रालोआचा सदस्य असलेल्या जदयू नेत्यांनीदेखील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर नाराजी व्यक्त केली. जदयू अध्यक्ष शरद यादव म्हणाले की, मोदी यांनी आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या घोषणा एकत्र करून राष्ट्रपतींनी भाषणात सांगितल्या. राष्ट्रपतींच्या लांबलचक भाषणादरम्यान अनेक जण पेंगत असल्याचे सांगत शरद यादव यांनी एक प्रकारे राष्ट्रपतींच्या भाषणातील हवाच काढून टाकली.

गुलाम नबी आझाद राज्यसभेत विरोधी पक्षनेते
जम्मू-काश्मीरमधून पुन्हा निवडून आलेले काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांची सोमवारी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून पुनíनवड करण्यात आली.आझाद हे या वरिष्ठ सभागृहाचे पाचव्यांदा सदस्य झाले आहेत. त्यांची सहा वर्षांची मुदत या महिन्यात संपणार असतानाच ८ फेब्रुवारी रोजी त्यांनी पुन्हा निवड झाली.

या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे…

  • सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी निवारा उपलब्ध करून देण्यास सरकार वचनबद्ध
  • समाजातील दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी सरकार विशेष काम करणार
  • विविध शिष्यवृत्त्यांमध्ये सुसूत्रता आणून मागासवर्गीयांना त्याचा लाभ योग्य वेळेत मिळण्यासाठी प्रयत्न
  • कामगार नियमांमध्ये पारदर्शकता आणून जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार
  • स्वच्छतेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य. स्वच्छ भारत अभियानालाही सर्वोच्च प्राधान्य
  • देशाच्या आर्थिक विकासाला आणखी गती देणार
  • काळा पैशांचे व्यवहार रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना
  • ‘मेक इन इंडिया’लाही सरकारचे प्राधान्य
  • गरिबी निर्मुलन, स्मार्ट शहरे आणि स्वच्छता यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या पातळीवर निर्णय घेण्यास सुरुवात
  • भूमी अधिग्रहण विधेयक मंजूर करून घेताना शेतकऱयांचे आणि जमीनदारांचे हित जोपासण्याकडेही लक्ष

Story img Loader