भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यातील ‘हुंकार रॅली’साठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपला नियोजित बिहार दौरा २६ ऑक्टोबरलाच संपविण्याचे आश्वासन दिल्याचे भाजपचे नेते आणि खासदार शाहनवाज हुसेन यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. 
३० हजार ‘नमो’ कुर्ते आणि साड्या ‘हुंकार’साठी मार्गस्थ!
पक्षाने पंतप्रधानपदाची उमेदवारी दिल्यानंतर मोदी देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सभा घेत आहेत. येत्या २७ ऑक्टोबर रोजी ते पाटण्यामध्ये सभा घेणार आहेत. या सभेची जोरदार तयारी सध्या पाटण्यामध्ये सुरू आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राष्ट्रपतींना २७ ऑक्टोबर रोजीच पाटण्यामध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. त्याचदिवशी त्यांनी पाटण्यामध्ये राष्ट्रपतींचा कार्यक्रमही आयोजित केला होता. एकाच दिवशी राष्ट्रपती आणि मोदी पाटण्यामध्ये आल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार असल्यामुळे नितीशकुमार यांच्या राजकारणावर कुरघोडी करण्यासाठी थेट राष्ट्रपतींनाच आपल्या दौऱयाचे वेळापत्रक बदलण्याची विनंती करण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. त्यानुसार पक्षाचे नेते राजीवप्रताप रुडी आणि शाहनवाज हुसेन यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रपती भवनामध्ये मुखर्जी यांची भेट घेतली आणि त्यांना परिस्थितीबद्दल माहिती दिली. या भेटीमध्ये राष्ट्रपतींनी आपला पाटणा दौरा २६ ऑक्टोबरलाच संपविण्याचे आश्वासन दिल्याचे शाहनवाज हुसेन यांनी सांगितले. राष्ट्रपती २६ ऑक्टोबरला पाटण्यातील पदवीप्रदान समारंभामध्ये सहभागी होतील आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते परत नवी दिल्ली येतील, असे हुसेन म्हणाले. यामुळे मोदी यांच्या नियोजित हुंकार रॅलीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रपती कार्यालयाकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.