‘रुपे’ या नावाची भारताची स्वत:ची कार्ड देय प्रणाली (कार्ड पेमेंट नेटवर्क) गुरुवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात ही प्रणाली राष्ट्राला समर्पित करण्यात येणार असल्याचे राष्ट्रपती भवनच्या सूत्रांनी सांगितले. या प्रणालीमुळे भारताची बँकिंग क्षमता जगभरात अधोरेखित होणार आहे.
भारतातील एक लाख ६० हजारांपेक्षा अधिक ‘एटीएम’मध्ये या कार्डाचा उपयोग होणार आहे. देशातील ९.४५ लाखांपेक्षा अधिक पीओएस टर्मिनल आणि अधिकाधिक ई-कॉमर्स टर्मिनलवरही या कार्डाचा वापर करता येईल.
याच कार्डाचे एक वेगळे स्वरूप म्हणजे ‘किसान कार्ड’ असेल. हे कार्ड सर्वच सरकारी बँकांमध्ये चालू शकेल. ४३ बँकांमध्ये डेबिट कार्ड म्हणूनही या कार्डाचा उपयोग होऊ शकतो. आयआरसीटीसी लवकरच ‘प्रीपेड रुपे’ कार्ड जारी करणार आहे.
कार्डचे वितरण
सध्या देशातील १५० सहकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँक ‘रुपे एटीएम कार्ड’ वितरित करणार आहे. एक कोटी ७० लाख ‘रुपे कार्ड’ सध्या वितरित करण्यात आले असून, प्रत्येक महिन्यात किमान ३० लाख कार्ड वितरित करण्यात येणार आहे.
रुपे म्हणजे काय?
रुपे हा शब्द रुपये आणि पेमेंट या दोन शब्दांपासून तयार करण्यात आला आहे. या नवीन योजना बँकिंग क्षेत्रातील भारताची क्षमता दर्शविते. या योजनेमुळे आंतरराष्ट्रीय कार्डावरील अवलंबन कमी होणार आहे. ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने (एनपीसीआई) ही योजना तयार केली आणि रिझव्र्ह बँकेने या योजनेला मान्यता दिली.