राजस्थानमधील एक महिला इंजिनीअरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुरक्षा भेदून ही महिला इंजिनीअर जवळ गेली होती. याप्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली होती. याबाबत आरोग्य अभियांत्रिक विभागाला आदेश देण्यात आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू ४ जानेवारीला राजस्थान दौऱ्यावर होत्या. तेव्हा विमानतळावर द्रौपदी मुर्मू यांचं आगमन झालं. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राजस्थानचे अन्य मंत्री, अधिकारी उपस्थित होते. तेव्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुरक्षा भेदून एक महिला इंजिनीअर तिथे आली आणि तिने पाया पडण्याचा प्रयत्न केला. पण, राष्ट्रपतींच्या सुरक्षा रक्षकांनी त्या महिला इंजिनीअरला तत्काळ तेथून बाजूला केलं.
हेही वाचा : राहुल गांधींनी देशात आर्थिक संकटाचा दिला इशारा; जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हणाले…
अंबा सियोल, असं या महिला इंजिनीअरचं नाव आहे. सियोल या पाण्याचं नियोजन पाहण्यासाठी तेथे उपस्थित होत्या. पण, तीन स्तरीय सुरक्षा तोडून सियोल राष्ट्रपतींच्या जवळ गेल्या. यानंतर स्थानिक पोलिसांनी सियोल यांची चौकशी करून सोडून दिलं. मात्र, राष्ट्रपतींच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीची केंद्रीय गृहमंत्री कार्यालयाकडून दखल घेण्यात आली होती. यानंतर १२ जानेवारीला महिला इंजिनीअरवर आरोग्य अभियांत्रिक विभागाने निलंबनाची कारवाई केली.