राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) या विभागात काम करणाऱ्या लष्करातील मेजरची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. लष्कराच्या चौकशीत हे आढळून आलं की राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या मेजरने हलगर्जीपणा केला. शिवाय भारताविषयीच्या गुप्त गोष्टी पाकिस्तानला कळवल्या, या प्रकरणात या मेजरचा समावेश असल्याचं आढळलं. ज्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी त्याची हकालपट्टी केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तातडीने केली हकालपट्टी
ही बाब समजल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लष्करी कायदा १९५० च्या कलम १८ ने दिलेल्या अधिकारांचा वापर करुन या मेजरची तातडीने हकालपट्टी केली आहे. मेजरच्या सगळ्या सेवा तातडीच्या प्रभावाने समाप्त करण्याचा आदेश दिला. हा आदेश १५ सप्टेंबर २०२२ रोजी जारी करण्यात आला. या महिन्याच्या सुरुवातीला या मेजरचं पोस्टिंग उत्तर भारतात करण्यात आलं होतं. हा मेजर २०२२ पासून लष्कराच्या रडारवर होताच. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबत हलगर्जीपणा केल्याच्या आरोपांची चौकशी सुरु करण्यात आली होती. त्यासाठी अधिकाऱ्यांची एक समितीही तयार करण्यात आली होती.
मेजर का आला होता लष्कराच्या रडारवर?
संशयास्पद आर्थिक व्यवहार, हेरगिरी करणं अशा गोष्टींमध्ये हा मेजर आहे अशी माहिती मिळाली होती. स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडद्वारे जी चौकशी समिती नेमण्यात आली त्या समितीने या मेजरचे सगळे व्यवहार, सोशल मीडिया अकाऊंट, इतर गोष्टी या सगळ्यावर त्यांच्या पद्धतीने नजर ठेवली. तसंच कुठलीही गुप्त माहिती पुरवण्यात त्याचा संभाव्य सहभाग आहे का? हे देखील तपासलं. त्यानंतर यात तो दोषी आढळल्याचं कळलं. ज्यानंतर राष्ट्रपतींनी या मेजरची तातडीने हकालपट्टी केली आहे.
लष्कराच्या नियमांचा भंग
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मेजरने त्याच्याकडे असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये गुप्त कागदपत्रांची एक प्रत ठेवली होती. अशा प्रकारे प्रत ठेवणं लष्कर नियमांच्या विरोधात आहे. तसंच सोशल मीडियावरच्या चॅटद्वारे हा माजे पाकिस्तानी गुप्तचराच्या संपर्कात होता असंही समजतं आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची या मेजरची चांगली मैत्री होती. ज्यापैकी काही जण ‘पटियाला पेग’ नावाच्या Whats App ग्रुपचे सदस्य होते. या ग्रुपवर त्याचं चॅटिंग काय काय होतं? तो बोलता बोलता कुणाकडून माहिती काढत होता का? या संदर्भातही चौकशी करण्यात आली. तसंच या प्रकरणात काही अधिकाऱ्यांना साक्षीदार म्हणूनही बोलवण्यात आलं.
इंडियन एक्स्प्रेसने जुलै २०२२ मध्ये एक बातमी दिली होती. ज्यामध्ये पटियाला पेग व्हॉट्स अॅप ग्रुपचे सदस्य असलेल्या चार अधिकाऱ्यांची लष्कर चौकशी करत असल्याचा उल्लेख होता. यामध्ये दोन निलंबित अधिकारी होते. जे दोघे दिल्लीच्या लष्करी गुप्तचर संचलनालयात काम करत होते. तिसरा अधिकारी डिफेन्स सर्व्हिस स्टाफ मध्ये तैनात होता तर चौथा अधिकारी मुंबईत तैनात होता अशी माहिती त्यांच्याबद्दल देण्यात आली होती. आता या प्रकरणात दोषी आढळलेल्या मेजरची तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे.