रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी रशियामध्ये वाढलेल्या महागाईबाबत विशेषतः अंड्याच्या किंमतीमध्ये ४० टक्क्यांची वाढ झाल्याबद्दल देशाची माफी मागितली आहे. हे रशियन सरकारचे अपयश असल्याचे सांगत त्यांनी म्हटले की, महागाई वाढल्याबाबत मी माफी मागतो. पण हे आमच्या सरकारचे अपयश आहे.
युक्रेन विरोधात रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ साली युद्ध पुकारले होते. त्याला आता जवळपास दोन वर्ष होत आले आहेत. या युद्धात रशियाची मोठी वित्तहानी आणि जीवितहानीही झाल्याचे बोलले जात आहे. तसेच युरोपियन युनियन आणि अमेरिकेने रशियाची आर्थिक नाकेबंदी करून युद्धावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच काही तासांत युक्रेनला गुडघे टेकायला लावू अशी वल्गना केल्यानंतर सुमारे दोन वर्षांपासून युक्रेनने मात्र कडवा प्रतिकार करून सर्वांनाच बुचकळ्यात पाडले. या सर्वांचा परिणाम असा झाला की, रशियाची अर्थव्यवस्था खालावली. यावर्षीच्या सुरुवातील अंड्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली.
पुतिन वर्षअखेरील वृत्तवाहिनीच्या माध्यमातून देशातील सामान्य नागरिकांशी संवाद साधत होते. यावेळी निवृत्ती वेतनावर गुजराण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक इरिना एकोपोव्हा यांनी अंडी आणि चिकनचे दर गगनाला भिडल्याचा मुद्दा उपस्थित केला. पाश्चिमात्य देशांनी निर्बंध घातल्यानंतर रशियाला अत्यावश्यक बाबींचा पुरवठा होत नाही आहे. तसेच जो पुरवठा होतो आहे, तो लष्करासाठी वळविला जात आहे. त्यामुळे देशाअंतर्गत महागाईने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. हाच मुद्दा इरिना यांनी उपस्थित केला.
रशियाची सांख्यिकी संस्था रोसस्टाटच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये अंड्यांच्या किमतीमध्ये १३ टक्क्यांची वाढ झाली आणि पुढच्याच नोव्हेंबर महिन्यात आणखी १५ टक्क्यांनी वाढ झाली. एक डझन अंडी घेण्यासाठी १३० रुबल्स (रशियन चलन) मोजावे लागत आहेत. भारतीय रुपयांमध्ये याची तुलना केल्यास जवळपास १२० रुपये होतात. युद्ध सुरू होण्यापूर्वी एक डझन अंड्याची किंमत फक्त १०० रुबल्स इतकी होती.
जागतिक पातळीवर अंड्यांच्या किमतीची माहिती ठेवणाऱ्या रोबोबँक या डच बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार रशियाने २०२२ साली १.२ अब्ज अंडी निर्यात केली होती. जी जागितक बाजारपेठेच्या तुलनेत १५ टक्के आहे. मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर जानेवारी २०२३ पासून पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादल्यामुळे रशियाला अंड्यांची निर्यात करता आलेली नाही. या निर्बंधामुळे उच्च प्रतीची अंडी उत्पादीत करण्यासाठी रशियन निर्यातदारांना लागणारा कच्चा माल (कोबंड्यासाठीचे खाद्य) आणि तंत्रज्ञान मिळणे कठीण झाले.
याचा परिणाम असा झाला की, अंडी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वस्त दरातील खाद्य किंवा तुलनेने स्वस्त मिळणारा कच्चा माल वापरण्यास सुरूवात केली. मात्र या पर्यायामुळे अंड्याचे उत्पादन कमी झाले. तसेच अनेक शेतकऱ्यांना कोबंड्याची संख्या वाढविण्यासाठी लागणारी उपकरणे, औषधेही निर्बंधामुळे मिळेनाशी झाली. ज्याचा परिणाम अंड्याचे दर वाढण्यात झाला.
पुतिन यांनी मान्य केले की, देशात अंड्याची मागणी वाढली असताना त्यावर उपाय शोधण्यात सरकार कमी पडले. आगामी काळात योग्य ती पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. यासाठी २०२४ च्या सुरुवातीच्या सहा महिन्यात १.२ अब्ज अंडी आयात करण्यात येणार असून त्यावर कर लावला जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली.