रशिया आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असले तरी पुतिन यांनी अमेरिकेच्या राजनैतिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रशिया सोडून जाण्याचे आदेश दिले आहे. या कारवाईनंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची शक्यता कमी असून आता संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेनेच पुढाकार घ्यावा असे पुतिन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने काही दिवसांपूर्वी रशियावर निर्बंध घातले होते. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील हस्तक्षेप आणि युक्रेनमधून ‘क्रिमीया’ला बाहेर काढण्याचा डाव यामुळे अमेरिकेने रशियावर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेच्या सिनेटमध्ये झालेल्या मतदानात ट्रम्प एकाकी पडले आणि सिनेटने रशियावर निर्बंध टाकण्याचा प्रस्ताव मंजूर केला. अमेरिकेच्या या निर्णयाचा रशियाने निषेध नोंदवला होता.
व्लादिमीर पुतिन यांनी रशियात काम करणाऱ्या अमेरिकेच्या राजनैतिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा अमेरिकेत परतण्याचे आदेश दिले. रशियात अमेरिकेचे एक हजार पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी आहेत. यातील ७५५ जणांनी रशियातील काम थांबवून मायदेशी जावे असे आदेश पुतिन यांनी दिले. ‘अमेरिकेसोबत संबंध सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. काही तरी बदल होईल असे आम्हाला वाटत होते. पण आता आमच्यावर अन्याय झाल्यास आम्ही तो खपवून घेणार नाही’ असा इशाराच त्यांनी अमेरिकेला दिला आहे. तर अमेरिकेने रशियाच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. गेल्या आठवड्यातही अमेरिकेशी संबंध ताणले गेले असतानाच रशियाच्या नौदलाने शक्तिप्रद्रशन केले होते. सीरियावरुनही अमेरिका आणि रशियात मतभेद निर्माण झाले होते.
डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांची मैत्री सर्वश्रृत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्यासाठी रशियाने हस्तक्षेप केल्याी चर्चा आहे. मात्र त्यानंतरही दोन्ही देशांमधील संबंध सुधारलेले नाही, काही दिवसांपूर्वी सिनेटमध्ये ओबामाकेअर नावाने आळखले गेलेले विधेयक रद्द करण्यासाठी झालेल्या मतदानात ट्रम्प यांना धक्का बसला होता.