बीजिंग : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या चिनी लष्कराच्या सैनिकांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संभाषण केले. तसेच त्यांच्या सज्जतेची पाहणी केली, अशी माहिती चीनच्या अधिकृत माध्यमांनी शुक्रवारी दिली.
यावेळी जिनपिंग यांनी शिनजियांग मिलिटरी कमांडच्या अंतर्गत खुंजेरबमधील सीमा संरक्षण स्थितीवर येथील पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) मुख्यालयातील सैनिकांशी संवाद साधला. अधिकृत प्रसारमाध्यमांना दाखवलेल्या चित्रफितीनुसार जिनपिंग यांनी सैनिकांशी संवाद साधताना अलीकडील वर्षांत हे क्षेत्र कसे बदलत आहे व त्याचा लष्करावर कसा प्रभाव पडत आहे, याचा उल्लेख केल्याचे दिसत आहे.
यावेळी संवादात एका सैनिकाने त्यांना उत्तर दिले, की ते सीमेवर २४ तास प्रभावीपणे देखरेख करत आहेत.
जिनपिंग यांनी यावेळी त्यांच्या स्थितीची विचारपूस करताना या दुर्गम भागात त्यांना ताज्या भाज्या मिळतात का, याची विचारणा केली. यावेळी जिनपिंग यांनी येथील लष्कराच्या सज्जतेची पाहणी केली.
जिनपिंग यांनी सीमेवरील सैनिकांना त्यांच्या सीमेवरील गस्त व इतर व्यवस्थापनाबद्दल विचारले आणि सीमा संरक्षणाचे आदर्श संबोधत त्यांची प्रशंसा केली. तसेच सैनिकांनी त्यांच्या कामगिरीत सातत्य ठेवण्यास व नवीन योगदान देण्यास जिनपिंग यांनी प्रोत्साहित केले.
संघर्षांची पार्श्वभूमी
पूर्व लडाख येथे ५ मे २०२० रोजी भारत व चीन यांच्यात पँगाँग सरोवर परिसरात झालेल्या िहसक संघर्षांनंतर उभय देशांत तणाव निर्माण झाला होता. पूर्व लडाख सीमेवरील वादावर दोन्ही बाजूंनी उच्चस्तरीय लष्करी चर्चेच्या १७ फेऱ्या झाल्या आहेत. परंतु दोन्ही देशांत प्रलंबित वादग्रस्त मुद्दय़ांच्या निराकरणासाठी कोणतीही महत्त्वपूर्ण हालचाल झाली नाही. चीनसोबतच्या द्विपक्षीय संबंध वृिद्धगत होण्यासाठी प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) शांतता आणि स्थैर्य आवश्यक असल्याचे भारताने वारंवार ठामपणे सांगितले आहे.