ल्यिव्हे : युक्रेनवर उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र (नो-फ्लाय झोन) लागू करावे असे आवाहन त्या देशाचे अध्यक्ष वोल्दिमिर झेलेन्स्की यांनी परराष्ट्रांना केले आहे. अशा प्रकारे नो-फ्लाय झोन जाहीर करण्यामुळे परराष्ट्रांच्या सैन्याचा थेट संबंध येणार असल्याने रशिया व युक्रेन यांच्यातील संघर्ष चिघळण्याचा धोका वाढणार आहे. अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला शस्त्रांची कुमक पुरवली असली, तरी त्यांनी आपल्या फौजा पाठवलेल्या नाहीत.
ज्यामुळे कुठल्याही अनधिकृत विमानाला युक्रेनच्या हवाई क्षेत्रात उडण्यास प्रतिबंध होईल असे नो-फ्लाय झोन जाहीर करण्याची शक्यता नाटो देशांनी नाकारली आहे. कुठल्याही तिसऱ्या पक्षाने युक्रेनवर ‘नो-फ्लाय’ झोनची घोषणा केल्यास त्यांनी सशस्त्र संघर्षांत भाग घेतल्याचे रशिया मानेल, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शनिवारी म्हटले होते.
युक्रेनमध्ये युद्धच- पोप
व्हॅटिकन सिटी : युक्रेनमध्ये आपण केवळ विशेष लष्करी मोहीम राबवित असल्याचा रशियाचा दावा पोप फ्रान्सिस यांनी फेटाळून लावला आहे. रशियाचे नाव न घेता ते म्हणाले की, युक्रेनवर युद्ध लादण्यात आले आहे. युक्रेनमध्ये रक्त आणि अश्रूंच्या नद्या वाहत आहेत. हे युद्धच असून त्यात मृत्यू, विध्वंस आणि दुर्घटनांची बीजे पेरली जात आहेत. सेंट पीटर्स चौकातील साप्ताहिक मेळाव्यात जमलेल्या नागरिकांपुढे ते बोलत होते. त्यांनी यावेळी शांततेचे आवाहन केले. नागरिकांना सुरक्षित जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.