राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली असून विरोधकांमध्ये संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा असताना त्यांनी मात्र स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे विरोधक आता कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच आता विरोधक पश्चिम बंगालचे राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्याती शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षातील काही नेत्यांनी फोनवरुन गोपाळकृष्ण गांधी यांच्याशी चर्चा केली असून राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारण्यासाठी विनंती केली आहे. २०१७ मध्ये गोपाळकृष्ण गांधी विरोधकांकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते. पण या निवडणुकीत व्यंकय्या नायडू यांनी त्यांचा पराभव केला होता.

गोपाळकृष्ण गांधी २००४ ते २००९ दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल

सूत्रांच्या माहितीनुसार, विरोधकांकडून इतर काही नावांवरही विचार केला जात आहे. गोपाळकृष्ण गांधी २००४ ते २००९ दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. त्यांनी विरोधकांकडे विचार करण्यासाठी काही वेळ मागितला असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान त्यांच्याशी चर्चा केलेल्या नेत्यांनी त्यांनी सकारात्मकपणे प्रतिसाद दिल्याचं म्हटलं आहे.

राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारणार का? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…

गोपाळकृष्ण गांधी यांनी होकार दिल्यास एकमताने त्यांच्या नावाला संमती दिली जाण्याची शक्यता आहे. याआधी विरोधकांकडून त्यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली गेली असल्याने विरोध होणार नाही असा अंदाज आहे.

President Election: विरोधकांच्या बैठकीआधी घडामोडींनी वेग; शिवसेनेनं घेतला मोठा निर्णय, महत्वाचा नेता दिल्लीकडे रवाना

७७ वर्षीय गोपाळकृष्ण गांधी यांनी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे. ते महात्मा गांधी आणि सी राजगोपालचारी यांचे नातू आहेत.

राष्ट्रपती निवडणुकीची राजकीय गणिते

सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधक या दोघांनीही त्यांच्या उमेदवाराचे नाव अद्याप घोषित केले नाही. त्यामुळे या निवडणुकीविषयीची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. आकड्यांच्या समीकरणात ४८% मते असलेला एनडीएचा उमेदवार हा शर्यतीत सर्वात पुढे असणार आहे. ओडिसातील बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी यांसारख्या मित्रपक्षांच्या साथीने एनडीएच्या उमेदवाराचा विजय सोपा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष मात्र राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध न होता गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही लढत व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसतर्फे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत.

कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?

निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ जून असणार आहे. १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, “आयोगाने मतदानाच्या दिवशी कोविड प्रोटोकॉल पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२३१ आहे, तर खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२०० आहे. दोन्ही मतदारांच्या मतांचे एकूण मूल्य १०,८६,४३१ आहे. खासदारांच्या एका मताचे मूल्य ७०० आहे. खासदारांना संसद भवनात मतदान करणे बंधनकारक असणार आहे. तर आमदाय त्यांच्या त्यांच्या राज्यात विधानभवनात मतदान करतील.

Story img Loader