राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून संयुक्त उमेदवार उभा करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी विचारणा केली. मात्र शरद पवारांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. शरद पवारांनी आपल्याला अजून सक्रीय राजकारणात राहायचं असल्याचं सांगितलं आहे.
याआधी शरद पवारांनी पक्षाच्या बैठकीत आपल्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम दिला होता. मुंबईत सोमवारी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी आपण राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांचे उमेदवार नसू असं स्पष्ट केलं होतं. “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असं शरद पवारांनी यावेळी उपस्थित कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं होतं.
ममता बॅनर्जी आणि शरद पवारांसोबत या बैठकीत माजी पंतप्रधान देवगौडा, मल्लिकार्जून खरगे, अखिलेश यादव, मेहबुबा मुफ्ती, सुभाष देसाई, ई करीम, जयराम रमेश, प्रफुल्ल पटेल, टी. आर. बालू , यशवंत सिन्हा, रणदीप सुरजेवाला, प्रियंका चतुर्वेदी( शिवसेना), उमर अब्दुल्ला, राजा आदी १८ नेते उपस्थित होते. या बैठकीत शरद पवारांनी अधिकृतपणे उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला.
Maharashtra Breaking News Live: दिल्लीत विरोधी पक्षांच्या बैठकीत मोदी सरकारवर टीकास्त्र
ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी संध्याकाळी शरद पवारांची भेट घेतली होती. बैठक सुरु होताच ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. शरद पवारांनी नकार दिला असता ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं नाव सुचवलं.
शरद पवार यांच्या नावाला तृणमूल काँग्रेससोबतच, शिवसेना, काँग्रेस आणि डाव्यांचा पाठिंबा होता. शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाला पसंती मिळत आहे.
पण रणनीतीवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या पहिल्याच बैठकीत काही पक्ष अनुपस्थित राहिले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, अकाली दल, आम आदमी पक्ष णि जगन रेड्डी या बैठकीला अनुपस्थित होते.
राष्ट्रपती निवडणुकीची राजकीय गणिते
सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधक या दोघांनीही त्यांच्या उमेदवाराचे नाव अद्याप घोषित केले नाही. त्यामुळे या निवडणुकीविषयीची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. आकड्यांच्या समीकरणात ४८% मते असलेला एनडीएचा उमेदवार हा शर्यतीत सर्वात पुढे असणार आहे. ओडिसातील बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी यांसारख्या मित्रपक्षांच्या साथीने एनडीएच्या उमेदवाराचा विजय सोपा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष मात्र राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध न होता गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही लढत व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसतर्फे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत.
कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?
निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ जून असणार आहे. १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, “आयोगाने मतदानाच्या दिवशी कोविड प्रोटोकॉल पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२३१ आहे, तर खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२०० आहे. दोन्ही मतदारांच्या मतांचे एकूण मूल्य १०,८६,४३१ आहे. खासदारांच्या एका मताचे मूल्य ७०० आहे. खासदारांना संसद भवनात मतदान करणे बंधनकारक असणार आहे. तर आमदाय त्यांच्या त्यांच्या राज्यात विधानभवनात मतदान करतील.