Presidential Poll Updates, 18 July 2022: देशाच्या १६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होणार आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होईल. द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता उरली आहे. देशाच्या दुसऱ्या महिला आणि आदिवासी समाजाच्या पहिल्या नेत्या येत्या २५ जुलै रोजी सर्वोच्च पदावर विराजमान होतील असा विश्वास सत्ताधारी पक्षाला आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ४८०९ लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असेल. लोकसभेचे ५४३ खासदार, राज्यसभेचे २३३ खासदार आणि ४०३३ विविध राज्यांमधील आमदारांमधून नव्या राष्ट्रपतींची निवड होईल.

एकूण ४८०९ लोकप्रतिनिधींचे मतांचे मूल्य हे १० लाख, ८६ हजार, ४३१ एवढे आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील ७७६ खासदारांच्या प्रत्येक मताचे मूल्य हे ७०० एवढे असेल. खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख, ४३ हजार, २०० आहे. विविध राज्यांमधील आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख, ४३ हजार, २३१ एवढे आहे.

Live Updates

Presidential Election Live updates: द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता उरली आहे

09:57 (IST) 18 Jul 2022
नरेंद्र मोदींचं विरोधकांना आवाहन

“आम्ही नेहमीच सभागृहाला संवादाचं एक सक्षम माध्यम, तीर्थक्षेत्र मानत आलो आहोत, जिथे खुल्या मनाने संवाद होण्याची आवश्यकता आहे. गरज पडली तर वाद, टीका झाली पाहिजे. गोष्टींचं विश्लेषण झालं पाहिजे, जेणेकरुन धोरणं आणि निर्णयांमध्ये सकारात्मक योगदान करता येईल. सखोल आणि उत्तम चर्चा झाली पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांच्या प्रयत्नाने सभागृह चालतं, उत्तम निर्णय घेऊ शकतं. त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपण सर्वांनी त्याचा राष्ट्रहितासाठी वापर करुयात. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं त्यांच्या स्वप्नांना लक्षात ठेवत सभागृहाचा सर्वाधिक सकारात्मक उपयोग झाला पाहिजे,” असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

09:49 (IST) 18 Jul 2022
संसद अधिवेशनाआधी नरेंद्र मोदींनी साधला संवाद

हा कालखंड सध्या फार महत्वाचा आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असून आगामी २५ वर्षात जेव्हा शतक साजरं होईल तेव्हा तो प्रवास कसा असावा, किती वेगाने करावा, कोणती नवी उंची गाठावी याचा संकल्प करण्याचा आणि त्यासाठी संसद देशाला दिशा देईल असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. देशाला नवी ऊर्जा देण्याचं कारण ठरण्यासाठी हे अधिवेशन महत्वाचं आहे असंही ते म्हणाले. आजपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होत असून त्याआधी नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत असल्यानेही विशेष महत्व आहे. याच कालखंडात देशाला नवे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती मिळणार असून त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

09:44 (IST) 18 Jul 2022
भाजपाने बसमधून आमदार आणले कारण…, नाना पटोलेंच्या टोल्यावर चंद्रकांत पाटलांचा प्रतिटोला

भाजपा बसमधून आमदार आणतं, या नाना पटोलेंच्या टोल्यावर प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला आपले आमदार सांभाळता येत नाहीत, भाजपा आपल्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची काळजी घेते असे सांगितले आहे. द्रौपदी मुर्मू २०० पेक्षा जास्त मतांनी विजयी होतील असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. गुप्त मतदान असल्याने विरोधी पक्षांमधले अनेक आमदार सद्सद्विविवेकबुद्धीला स्मपून मुर्मू यांना मत देतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

09:42 (IST) 18 Jul 2022
आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि मला मतदान करा – यशवंत सिन्हा

निवडणुकीच्या एक दिवस आधी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी ट्वीट करत सर्व आमदार आणि खासदार आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकत मला मतदान करा असं आवाहन केलं आहे.

उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीची घोषणा विरोधकांनी रविवारी केली. उपराष्ट्रपतीपदाचे ‘रालोआ’चे उमेदवार म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांच्या नावाची भाजपने शनिवारी घोषणा केली होती. त्यामुळे ६ ऑगस्टला होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत धनखड आणि अल्वा यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.