Droupadi Murmu Swearing-in: द्रौपदी मुर्मू यांनी आज देशातील सर्वोच्च पदाची शपथ घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. संसदेत सकाळी १०.१५ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. त्यानंतर देशाच्या नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी देण्यात आली.

त्यानंतर राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू देशाला उद्देशून पहिलं भाषण केलं. या सोहळय़ाला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, खासदार आदी उपस्थित होते.

देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होणाऱ्या मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या नागरिक ठरल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला झालेली निवडणूक एकतर्फी ठरली. त्यात मुर्मू यांना ६४ टक्के, तर प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली होती.

Live Updates

Droupadi Murmu Swearing-in: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत

11:00 (IST) 25 Jul 2022
"देशातील महिला, मुली जास्तीत जास्त सक्षम झाल्या पाहिजेत"

"देशातील महिला, मुली जास्तीत जास्त सक्षम झाल्या पाहिजेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी योगदान दिलं पाहिजे. तरुण फक्त आपलं भविष्य निर्माण करत असून देशाच्या भविष्याचा पायाही रचत आहेत. माझं तुम्हाला नेहमी पाठिंबा असेल," असं आश्वासन मुर्मू यांनी दिला.

10:54 (IST) 25 Jul 2022
शपथविधी सोहळा पूर्ण

द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहित सर्व उपस्थितांचे आभार मानले.

10:50 (IST) 25 Jul 2022
करोना काळात भारताने केलेल्या कामाचं कौतुक

"भारत आज प्रत्येक क्षेत्रात विकास करत आहेत. करोना काळात भारताने जे सामर्थ्य दाखवलं, त्यामुळे संपूर्ण जगाला आपल्यासोबत पुढे नेण्याचं काम केलं. आपण भारतीयांनी आपल्या प्रयत्नांनी फक्त जागित संकटाचा सामना केला, तर जगासमोर नवे मापदंडही ठेवले. काही दिवसांपूर्वी आपण २०० कोटी डोस देण्याचा विक्रम केला आहे. या संपूर्ण लढाईत भारताने दाखवलेला संयम, साहस आपली शक्ती आणि संवदेनशीलतेचं प्रतीक आहे. भारताने जगालाही मदत केली. आज जग भारताकडे नव्या विश्वासाने पाहत आहे," असं गौरवौद्गार द्रौपदी मुर्मू यांनी काढले.

10:46 (IST) 25 Jul 2022
"मी पूर्ण निष्ठेने कर्तव्याचं पालन करेन"

"देशाला राष्ट्रपतीपदाची मोठी परंपरा असून मी पूर्ण निष्ठेने कर्तव्याचं पालन करेन. सर्व देशवासीय माझ्या ऊर्जेचे स्तोत्र असतील," असं प्रतिपादन मुर्मू यांनी केलं.

10:42 (IST) 25 Jul 2022
"देशातील करोडो महिला आणि मुलींच्या स्वप्न आणि सामर्थ्याची झलक"

देशातील गरिबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. देशातील करोडो महिला आणि मुलींच्या स्वप्न आणि सामर्थ्याची झलक आहे असंही मुर्मू यांनी सांगितलं. प्रगतशील भारताचं नेतृत्व करताना मला अभिमान वाटत आहे. सर्व देशाविसायांना आणि खासकरुन तरुण, महिलांना आश्वस्त करु इच्छिते की, त्यांच्या हिताला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन मुर्मू यांनी दिलं आहे.

10:38 (IST) 25 Jul 2022
"राष्ट्रपती होणं माझं वैयक्तिक यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचं यश"

"वॉर्ड काऊन्लिसर ते देशाच्या राष्ट्रपती होण्याची संधी मला मिळाली आहे. ही भारताची महानता असून लोकशाहीची ताकद आहे. यामुळेच एका गरिब घरातील जन्मलेली मुलगी देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकते. राष्ट्रपती होणं माझं वैयक्तिक यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचं यश आहे. भारतात गरीब स्वप्न पाहू शकतो आणि पूर्णही करु शकतो हेच यामधून सिद्ध होत आहे. अनेक वर्ष सुविधांपासून वंचित राहिलेल्या दलित, गरीब आदिवासी माझ्यात आपलं प्रतिबिंब पाहू शकतात," असंही द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं.

10:35 (IST) 25 Jul 2022
"कॉलेजमध्ये जाणारी माझ्या गावातील मी पहिली व्यक्ती"

"ओडिशामधील छोट्याश्या आदिवासी गावातून माझा प्रवास सुरु झाला होता. तिथे प्राथमिक शिक्षण मिळणंही स्वप्नाप्रमाणे होतं. पण अनेक अडथळ्यांनंतरही मी संकल्प सोडला नाही. कॉलेजमध्ये जाणारी माझ्या गावातील मी पहिली व्यक्ती होती," असं मुर्मू यांनी सांगितलं.

10:32 (IST) 25 Jul 2022
"भारताच्या उज्वल भविष्याचा प्रवास सर्वांच्या सोबतीने करायचा आहे"

"आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी नागरिकांकडून ज्या अपेक्षा केल्या आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी गतीने काम करावं लागणार आहे. 'सबका प्रयास, सबका कर्तव्य' या मार्गावर वाटचाल करावी लागणार आहे. भारताच्या उज्वल भविष्याचा प्रवास सर्वांच्या सोबतीने करायचा आहे," असं आवाहन द्रौपदी मुर्मू यांनी केलं.

10:26 (IST) 25 Jul 2022
'सबका प्रयास, सबका कर्तव्य' , मुर्मू यांचं आवाहन

स्वतंत्र भारतात जन्म झालेली मी पहिली राष्ट्रपती आहे. पुढील २५ वर्षात आपल्याला 'सबका प्रयास, सबका कर्तव्य' या दोन मार्गांवर वाटचाल करावी लागणार आहे असं आवाहन द्रौपदी मुर्मू यांनी केलं.

10:23 (IST) 25 Jul 2022
द्रौपदी मुर्मू यांनी मानले देशवासियांचे आभार

"आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना मला ही संधी मिळाली आहे. देश आपल्या स्वातंत्र्याची ५० वर्ष साजरी करत असताना, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती. आज ७५ व्या वर्षात मला ही नवी संधी मिळाली आहे. २५ वर्षाचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत असताना ही जबाबदारी मिळणं माझं सौभाग्य आहे," असं सांगत द्रौपदी मुर्मू यांनी सर्व आमदार, खासदार तसंच देशवासियांचे आभार मानले.

10:16 (IST) 25 Jul 2022
द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ

द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली.

10:11 (IST) 25 Jul 2022
द्रौपदी मुर्मू यांचं संसदेत स्वागत

द्रौपदी मुर्मू यांचं संसदेत स्वागत करण्यात आलं ते क्षण

10:09 (IST) 25 Jul 2022
द्रौपदी मुर्मू संसद भवनात दाखल

द्रौपदी मुर्मू मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत संसद भवनात दाखल झाल्या आहेत. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथविधी पार पडणार आहे.

10:03 (IST) 25 Jul 2022
द्रौपदी मुर्मू संसदेकडे रवाना

द्रौपदी मुर्मू शपथविधीसाठी संसदेच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. यावेळी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंददेखील त्यांच्यासोबत आहेत.

09:59 (IST) 25 Jul 2022
जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे

१) द्रौपदी मुर्मू यांनी सकाळी राजघाटला भेट देत राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

२) शपथविधी सोहळ्याआधी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू संसदेत पोहोचतील.

३) याशिवाय राष्ट्रपती भवनात सकाळी ९ वाजून ४२ मिनिटांनी एक औपचारिक कार्यक्रम पार पडेल. पण जर पाऊस असेल तर हा कार्यक्रम रद्द केला जाणार असल्याचं शपथविधीच्या वेळापत्रकात नमूद आहे.

४) उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री परिषदेचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार आणि प्रमुख नागरी व लष्करी अधिकारी शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.

५) रविवारी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री परिषदेतील सदस्यांसाठी राष्ट्रपती भवनात डिनरचं आयोजन केलं होतं.

६) देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होणाऱ्या मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या नागरिक आणि दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला झालेली निवडणूक एकतर्फी ठरली. त्यात मुर्मू यांना ६४ टक्के, तर प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली होती.

७) द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर ओडिशामधील त्यांच्या गावी गुरुवारपासूनच मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला जात आहे.

८) द्रौपदी मुर्मू २०१५ मध्ये झारखंडच्या राज्यपालपदाची शपथ घेणार्‍या पहिल्या महिला ठरल्या होत्या.

९) द्रौपदी मुर्मू दोन वेळा आमदार राहिल्या असून ओडिशात भाजपाच्या पाठिंब्याने बिजू जनता दलाची सत्ता असताना नवीन पटनाईक सरकारमध्ये मंत्री होत्या.

१०) द्रौपदी मुर्मू यांना ओडिशा सरकारमध्ये वाहतूक, वाणिज्य, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन यासारखी मंत्रालयं हाताळताना प्रशासकीय कामांचा अनुभव आहे.

09:54 (IST) 25 Jul 2022
रामनाथ कोविंद यांनी द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्रपती भवनात केलं स्वागत

द्रौपदी मुर्मू सोमवारी सकाळी राष्ट्रपती भवनात दाखल झाल्या. यावेळी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नीने त्यांचं स्वागत केलं.

09:50 (IST) 25 Jul 2022
द्रौपदी मुर्मू : आदिवासी सक्षमीकरणाचे प्रतीक

देशाच्या प्रथम नागरिक द्रौपदी मुर्मू या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदिवासी सक्षमीकरणाप्रति असलेल्या बांधिलकीच्या मूर्तिमंत प्रतीक आहेत.

भारतात आदिवासी जमातींची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ९ टक्के आहे. त्यांचे आपल्या स्वातंत्र्यलढय़ातील योगदान आणि त्याग अमूल्य आहे. तो कधीच विस्मरणात जाऊ शकत नाही. मात्र स्वातंत्र्यानंतर आलेल्या एकाही सरकारने आदिवासी जमातींच्या विकासासाठी आणि उत्थानासाठी कुठलीच ठोस पावले उचलली नाहीत, हे कटू सत्य आहे. आदिवासींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी त्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत आणि त्यांना योग्य राजकीय प्रतिनिधित्वदेखील मिळाले नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा विशेष लेख

09:48 (IST) 25 Jul 2022
द्रौपदी मुर्मू यांनी राजघाटवर वाहिली श्रद्धांजली

शपथविधीआधी द्रौपदी मुर्मू यांना राजघाटवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

09:46 (IST) 25 Jul 2022
द्रौपदी मुर्मू राजघाटसाठी रवाना

द्रौपदी मुर्मू सकाळी ८ च्या सुमारास राजघाटसाठी आपल्या निवासस्थानावरुन रवाना झाल्या.

09:46 (IST) 25 Jul 2022
शपथविधी सोहळ्यातील दौप्रदी मुर्मू यांची साडी असणार फारच खास

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू या आज, देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. संसदेत सकाळी १०.१५ वाजता हा शपथविधी सोहळा होईल. या सोहळ्यासाठी मुर्मू या पारंपारिक संथाली साडी नेसणार असल्याचं सांगितलं जात आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

09:45 (IST) 25 Jul 2022
द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी कधी आणि कुठे पार पडणार?

द्रौपदी मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणर आहेत. संसदेत सकाळी १०.१५ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यानंतर त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाईल. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ देतील. यानंतर त्या देशाला संबोधित करत पहिलं भाषण करतील.

द्रौपदी मुर्मू २०१५ मध्ये झारखंडच्या राज्यपालपदाची शपथ घेणार्‍या पहिल्या महिला ठरल्या होत्या. द्रौपदी मुर्मू दोन वेळा आमदार राहिल्या असून ओडिशात भाजपाच्या पाठिंब्याने बिजू जनता दलाची सत्ता असताना नवीन पटनाईक सरकारमध्ये मंत्री होत्या. द्रौपदी मुर्मू यांना ओडिशा सरकारमध्ये वाहतूक, वाणिज्य, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन यासारखी मंत्रालयं हाताळताना प्रशासकीय कामांचा अनुभव आहे.

Story img Loader