राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देण्यासाठी एकीकडे विरोधी पक्षांकडून बैठकींचं सत्र सुरु झालेलं असतानाच सत्ताधारी भाजपानेही यासंदर्भात आता हलचाली सुरु केल्या आहेत. भाजपाचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह हे सध्या सर्वानुमते योग्य उमेदवार देण्यासंदर्भात चाचपणी करत आहेत. राजनाथ यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा सुरु केल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती, काँग्रेसचे नेत मल्लिकार्जून खरगे, तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचा समावेश असल्याची माहिती सुत्रांनी बुधवारी दिली.

कोणाशी केली चर्चा?
भाजपाकडून राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातील उमेदवाराची निवड आणि पूर्वनियोजनाची जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे सोपवण्यात आलीय. विरोधी पक्षांसोबत चर्चा करुन सर्वांची मतं विचारात घेऊन सर्वांचा पाठिंबा असणारा उमेदवार या निवडणुकीसाठी देता येईल का यासंदर्भात सध्या सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांसोबत चर्चा सुरु आहे. सिंह यांनी मल्लिकार्जून खरगे, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. दिल्लीतील कन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये विरोधी पक्षांकडून संयुक्त उमेदवार देण्याबाबत झालेल्या १६ पक्षांच्या बैठकीच्या दिवशीच राजनाथ यांनी फोनवरुन या नेत्यांसोबत चर्चा केली. शरद पवारांशीही राजनाथ यांनी फोनवरुन या निवडणुकीसंदर्भात चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

राजनाथ यांनी जनता दलचे (युनायटेड) नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच बिजू जनता दलचे नेते आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशीही फोनवरुन चर्चा केल्याचं सुत्रांनी सांगितलं. यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रामुख्याने भाजपाकडून कोणाला उमेदवारी देण्याची शक्यता आहे याबद्दल राजनाथ यांच्याकडे चौकशी केल्याचं सुत्रांनी म्हटलंय.

पवारांच्या नावाची शिफारस, पण पवारांनी दिला नकार
बुधवारी पार पडलेल्या १६ विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीची शिफारस करण्यात आली. मात्र, पवारांनी स्पष्ट नकार दिल्यामुळे पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे.राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाचा आग्रह करण्यात आला. मात्र, त्यांनी नकार दिल्यामुळे अन्य नावांचा विचार केला जात आहे. यासंदर्भात पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील आणि सर्वसंमतीने उमेदवार निश्चित केला जाईल, असे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांना सांगितले. २१ जून रोजी विरोधी पक्षांची पुन्हा बैठक होणार असून, त्यामध्ये उमेदवारावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

इतर चर्चेतील नावं कोण?
तृणमूल काँग्रेसने महात्मा गांधींचे नातू गोपालकृष्ण गांधी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांची नावे सुचवली आहेत. याशिवाय, गुलाम नबी आझाद आणि यशवंत सिन्हा यांचेही नाव चर्चेत आहे. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ जून हा अखेरचा दिवस आहे.

मोदी सरकारविरोधात विरोधक एकवटले
केंद्रातील मोदी सरकारने लोकशाही संपवण्याचा घाट घातला असून, देशभर बुलडोझर चालवले जात आहेत. घटनात्मक संस्था कमकुवत केल्या जात आहेत. त्यामुळे मोदी सरकारविरोधात एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी सहमतीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला पाहिजे. या बैठकीत विरोधकांनी एकत्र येण्यासाठी पहिले पाऊल टाकले गेले आहे, असे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार निवडीसाठी झालेल्या या बैठकीत मोदी सरकारविरोधी ठराव संमत करण्यात आला. मात्र, आगाऊ सूचना न देता ममता बॅनर्जी यांनी हा ठराव मांडून सहमत करून घेतल्याबद्दल विरोधकांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याचे समजते!

काँग्रेसकडून ममतांना पाठिंबा
काँग्रेसच्या वतीने मल्लिकार्जुन खरगे यांनी निवेदन प्रसिद्ध करून राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात ममतांनी घेतलेल्या पुढाकाराला पाठिंबा दिला. संघ आणि भाजपाच्या विभाजनवादी आणि विनाशकारी धोरणाविरोधात विरोधकांचा सहमतीचा उमेदवार उभा केला पाहिजे. अनेक राज्यांमध्ये आपण (प्रादेशिक पक्ष व काँग्रेस) एकमेकांविरोधात लढतो. पण, देशहिताच्या व्यापक दृष्टिकोनातून आपण बैठकीत सहभागी झालो आहोत. हाच सकारात्मक विचार कायम ठेवला पाहिजे, असे खरगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

विरोधकांनी एकवटले पाहिजे : शिवसेना
केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली असून सर्व विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी सक्षम उमेदवार ठरवावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. पवार यांनी नकार दिल्यास राजकीय परिघाबाहेरील सर्वमान्य उमेदवार निवडावा, अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. भाजपाविरोधातील पक्षांना एकत्र आणण्याची सुरुवात महाराष्ट्राने केली. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी ही सुरुवात केली. केवळ राष्ट्रपती निवडीसाठी नव्हे, तर सर्व विरोधी पक्षांनी एकजूट मजबूत केली पाहीजे, असे देसाई म्हणाले.

पाच पक्षांनी ममतांच्या बैठकीकडे फिरवली पाठ
ममता बॅनर्जी यांनी २२ बिगरभाजपा पक्षांना बैठकीचे आमंत्रण दिले होते. मात्र, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय तेलंगण समिती, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांनी बैठकीकडे पाठ फिरवली. मात्र, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल पटेल, माकपचे एलामारन करीम, भाकपचे विनय विश्वम, शिवसेनेचे सुभाष देसाई, प्रियंका चतुर्वेदी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, सपचे अखिलेश यादव, यशवंत सिन्हा आदी नेते उपस्थित होते.

Story img Loader