राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय जरी निश्चित होता, तरी अपेक्षित मतांपेक्षा जास्त मते मिळतात का, विरोधकांची किती मते फुटतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आदिवासी समाजातील महिला उमेदवार देत पाठिंबा ऐरवी न देणाऱ्यांची काही मते आधीच मिळवण्यात भाजपाला यश आले होत. तेव्हा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अपेक्षापेक्षा काही मते जास्त मुर्मू यांना मिळाल्याचे, विरोधी पक्षातील काही खासदार आणि आमदारांनी मते दिल्याचे स्पष्ट झालं आहे.
द्रौपदी मुर्मू यांना संसदेत ५४० खासदारांनी तर देशातील २ हजार २८४ आमदारांनी मते दिली. या मतांचे एकुण मुल्य हे ६ लाख ७६ हजार ८०३ एवढं होतं. तर विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ खासदारांनी तर देशातील १६६९ आमदारांनी आपले मत दिले. या मतांचे एकुण मुल्य हे ३ लाख ८० हजार १७७ एवढं झालं आहे. एकुण ५३ मते ही बाद झाली होती. थोडक्यात प्रत्यक्ष मतदान झालेल्या एकुण ४७०१ मतांपैकी दोन हजार ८२४ मते मुर्मू यांना मिळाली, ६४.०३ टक्के एवढी मते मिळाली आणि त्या विजयी झाल्या.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी विविध दावे केले जात होते. भाजप खासदारांची संख्या, भाजपशासित राज्ये, बिजू जनता दलासह काही छोट्या पक्षांनी जाहीर केलेला पाठिंबा लक्षात घेता मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा जास्त मते सहज मिळतील असा अंदाज होता. तर भाजपाच्या काही नेत्यांनी ही टक्केवारी ७० टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाजही व्यक्त केला होता. मतमोजणी झाल्यावर अपेक्षेपेक्षा फार नाही काही जास्त मते निश्चितच मुर्मू यांना मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार गुजरातमध्ये विरोध पक्षांतील १० आमदारांची मते फुटली. आसाममध्ये सर्वाधिक जास्त २२, उत्तर प्रदेशमध्ये १२ आणि गोव्यातील ४ विरोधी पक्षातील आमदारांनी मुर्मू यांच्या पारड्यात मते टाकली. देशभरात विरोधी पक्षाच्या एकुण १२६ आमदारांनी मुर्मू यांना मतदान केले. तर संसदेत अपेक्षा नसतांना विरोधी पक्षातील विविध पक्षांच्या एकुण १७ खासदारांनी मुर्मू यांना मतदान केले.
आंध्र प्रदेश, नागालँड आणि सिक्कीम राज्यातील सर्वच्या सर्व आमदारांची मते मुर्मू यांना मिळाली. केरळामध्ये भाजपाचा एकही आमदार नसतांना तेथून एक मत मुर्मू यांना मिळाले. तर तेलंगणा सारख्या राज्यात यशवंत सिन्हा यांना सर्वाधिक म्हणजे ११३ मते मिळाली आणि भाजपाला ३ मतांवर समाधान मानावे लागले. बाकी सर्व राज्यात अपेक्षे एवढे मतदान हे मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांना झाले आहे.