देशाच्या १६व्या राष्ट्रपतीसाठी आज निवडणूक पार पडली. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होती. दरम्यान, आज झालेल्या निवडणुकीत ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला, तर देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले. राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर

राष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रियेला सकाळी १० वाजता संसद भवनात सुरूवात झाली. ही मतदान प्रक्रिया संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मतदान केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही सभागृहात मतदान केले.

यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मुलायम सिंह यादव यांनी व्हीलचेअरवर संसदेत दाखल होत मतदानाचा हक्क बजावला. तर ओडिशा विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले भाजप नेते प्रदीप्ता कुमार नाईक यांनीही रुग्णालयातून थेट ऑक्सिजन सिलेंडरसह व्हीलचेअरवर येत विधान भवनात येऊन मतदान केले.

हेही वाच – शिंदे गटाकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित; मुख्य नेते पदी एकनाथ शिंदे, तर उद्धव ठाकरेंना…

राष्ट्रपती पदासाठी देशभरातील राज्यांच्या विधानसभांमध्येही मतदान पार पडले. छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम आणि तामिळनाडू या 10 राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झाले.

महाराष्ट्रात विधानभवन येथे झालेल्या मतदान प्रक्रियेत २८७ पैकी २८३ आमदारांनी मतदान केले. आजारी असलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेना आमदार महेंद्र दळवी, तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदान केले नाही. राज्यात विधानसभेच्या २८८ जागा असल्या तरी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त झाल्याने सध्याचे संख्याबळ २८७ आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये, शिरोमणी अकाली दलचे आमदार मनप्रीत सिंग अयाली यांनी राष्ट्रपती निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. राज्याशी संबंधित अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे, असा आरोप करत त्यांनी केला होता.

हेही वाचा – देशात मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर; सर्वच विमानतळांवर….

गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचा (यूपीए) मित्रपक्ष आहे, असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार कंधल जडेजा यांनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले, याबाबतची माहिती त्यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना दिली. दरम्यान, गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पटेल यांनी जडेजाकडे स्पष्टीकरण मागितले असल्याची माहिती आहे.

झारखंडचे राष्ट्रवादीचे आमदार कमलेश सिंह यांनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे जाहीर केल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सिंह म्हणाले की, त्यांनी मतदान करताना विवेकबुद्धीचा वापर केला.

आज राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

Story img Loader