नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याची तुलना ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी होऊ लागल्यानंतर आता पाकिस्तानविरोधात एखादी लष्करी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढू लागल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. दिल्लीतील नॉर्थ व साऊथ ब्लॉकमध्ये दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सूत्रधारांना धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी दिवसभर बैठकांचा सपाटा लावला. या बैठकांमध्ये दहशतवादी हल्ल्याविरोधात प्रत्युत्तर देण्याची रणनीती निश्चित केल्याचे मानले जाते. पहलगाम हल्ल्याला चोवीस तास उलटल्यानंतर, बुधवारी राजनाथ सिंह यांची भूमिका सोमार आली. ‘‘केवळ हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनाच नव्हे तर या कटात सहभागी झालेल्या सूत्रधारांना योग्य धडा शिकवला जाईल,’’ असे त्यांनी संरक्षणविषयक कार्यक्रमात जाहीरपणे ठणकावले. त्यावर भाजपच्या समाजमाध्यम विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’वरून प्रतिक्रिया दिली. ‘पाकिस्तानसाठी यापेक्षा स्पष्ट इशारा असू शकत नाही’, असे सांगत त्यांनी एका अर्थी कठोर कारवाईसाठी केंद्र सरकारवर दबाव वाढविला.
सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी हा दौरा मध्येच स्थगित करून बुधवारी दिल्लीला परतले. विमानतळावरच मोदींनी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परदेश सचिव विक्रम मिसी उपस्थित होते.
दरम्यान, पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसैन हक्कानी यांनीही पाकिस्तानला या हल्ल्याची मोठी किंमत मोजावी लागेल, अशी शक्यता ‘एक्स’वरून व्यक्त केली. ‘‘७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलमध्ये हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे गाझामध्ये भयानक हिंसाचार घडला. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला संभाव्य परिणाम आणि परिणामांच्या बाबतीतही तितकाच धोकादायक आहे’’, असे त्यांनी लिहिले.
संरक्षण दलाच्या प्रमुखांची बैठक
राजनाथ सिंह यांनी बुधवारी संरक्षण दलाच्या प्रमुखांची बैठक घेतली. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि हवाई दलाचे प्रमुख मार्शल ए. के. सिंग उपस्थित होते. लष्कर प्रमुख द्वेवेदी यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेच्या स्थितीचा आढावा घेतला.
काँग्रेस नेत्यांची गृहमंत्र्यांशी चर्चा
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मीरमधील अन्य वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आणि हल्ल्याबद्दल अधिक माहिती घेतली. या क्षणी देशात ऐक्याची गरज असल्याचे खरगे यांनी ‘एक्स’वर लिहिले.
मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत
जम्मू आणि काश्मीर सरकारने बुधवारी दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर केली. या हल्ल्यात गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपये देण्याची घोषणाही करण्यात आली.
अमित शहांच्या हाती सूत्रे !
हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने सूत्रे हाती घेतली. त्यांनी बुधवारी दिवसभर काश्मीरमधील परिस्थिती तत्परतेने हाताळली. श्रीनगरमध्ये शहांनी या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली व त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या हल्लेखोरांना धडा शिकवला जाईल, असे आश्वासन शहा यांनी दिले. शहा यांनी हल्ल्यातील जखमींचीही अनंतनागमधील सरकारी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली व त्यानंतर पहलगाममधील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दहशतवादी हल्ल्याचे वृत्त समजताच शहा मंगळवारी सायंकाळी श्रीनगरला रवाना झाले.
भाजपविहिंप आक्रमक
पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याची हिंमत पाकिस्तान करू शकणार नाही असा धडा शिकला पाहिजे, असे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. हिंदूंना किती काळ त्रास सहन करावा लागणार, हे विचारण्याची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले. तर पहलगाम हल्ला म्हणजे पाकिस्तानने भारताविरोधात केलेली युद्धाची घोषणा असून केंद्र सरकारने त्याच भाषेत पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन म्हणाले.