वृत्तसंस्था, जेरुसलेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इजिप्तमधून गाझा पट्टीत मर्यादित मानवतावादी मदत पोहोचू देण्याचे इस्रायलने मान्य केले आहे. बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी यासंबंधी घोषणा केली. त्याचवेळी गुरुवारी, युद्धाच्या १३व्या दिवशी इस्रायलने दक्षिण गाझासह संपूर्ण गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरूच ठेवले.

गाझामधील अल-अहली रुग्णालयात झालेल्या स्फोटानंतर गाझा पट्टीमध्ये मानवतावादी मदतीचा रस्ता मोकळा करावा यासाठी इस्रायलवर दबाव वाढला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी यासंबंधी पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केल्यानंतरब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक गुरुवारी इस्रायलला  गेले.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या युद्धात आतापर्यंत ३,४७८ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून १२ हजारांपेक्षा जास्त जखमी झाले आहेत. तर इस्रायलमध्ये १,४०० जणांचा मृत्यू झाला आहे. हमासने २०६ जणांना ओलीस धरले असून त्यांच्या कुटुंबीयांना सूचित करण्यात आल्याचे इस्रायलने सांगितले.

Video: “इथे काय चाललंय? मला खरंच धक्का बसलाय”, इस्रायलच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी UN च्या भरसभेत व्यक्त केला संताप!

बेकरींवर हल्ल्यांचा आरोप

इस्रायल हवाई हल्ले करताना वारंवार गाझा पट्टीतील बेकरींना लक्ष्य असल्याचा आरोप सरकारच्या माध्यम कार्यालयाने केला आहे. पॅलेस्टिनी नागरिक ब्रेड विकत घेण्यासाठी रांगेत उभे असताना बेकरीवर हवाई हल्ला झाल्यामुळे अनेक जण मृत आणि जखमी झाले असे सांगण्यात आले. यामुळे नागरिकांसमोरील समस्या अधिक वाढल्या आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

ऋषी सुनक इस्रायलमध्ये

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक गुरुवारी इस्रायलच्या दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला पाठिंबा जाहीर केला, तसेच गाझा पट्टीतील लोकांना मानवतावादी मदतसामग्री पुरवण्याचेही आवाहन केले. सुनक यांनी पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि अध्यक्ष आयझ्ॉक हरझोग यांची भेट घेतली. युद्धाची व्याप्ती वाढू नये यावर सुनक आणि हरझोग यांनी सहमती व्यक्त केली.

बायडेन यांचा इस्रायलला इशारा 

वॉशिंग्टन : हमास आणि इस्रायलदरम्यान सुरू असलेल्या युद्धामध्ये इस्रायलने गाझामधील विस्थापित झालेल्या लोकांचा त्रास कमी करण्यासाठी मानवतावादी मदतीस परवानगी दिली नाही तर त्यांना परिणामांसाठी जबाबदार धरले जाईल, असे आपण इस्रायलच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितले असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी स्पष्ट केले. हमासबरोबरच्या युद्धामध्ये इस्रायलचे मोठे नुकसान झाले आहे, पण कोणताही पर्याय शिल्लक नसलेल्या गाझामधील लोकांच्या व्यथा कमी करण्याची संधी गमावली तर त्यांची जगभरातील विश्वासार्हता कमी होईल, असे मत बायडेन यांनी इस्रायलच्या दौऱ्यावरून परत आल्यानंतर व्यक्त केले.

सौम्या विश्वनाथनचे मारेकरी एका टॅटूमुळे आणि वायरलेसमुळे पोलिसांनी कसे शोधले? जाणून घ्या..

हल्ल्यासाठी उत्तर कोरियाच्या शस्त्रास्त्रांचा वापर?

हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या हल्ल्यासाठी उत्तर कोरियाच्या शस्त्रास्त्रांचा वापर केला असावा या शक्यतेला पुष्टी देणारे पुरावे समोर आले आहेत. इस्रायलने जप्त केलेली हमासची चित्रफीत आणि शस्त्रास्त्रे यातून या संशयाला बळकटी मिळत आहे. उत्तर कोरियाने मात्र हमासला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत असल्याचे नाकारले आहे.

इजिप्त-अमेरिका चर्चा

इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह एल-सिसी आणि अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल मायकेल कुरिला यांची कैरोमध्ये भेट झाली. या भेटीत दोघांदरम्यान इस्रायल आणि गाझादरम्यान स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्नांसंबंधी चर्चा करण्यात आली.

ऑस्ट्रेलियाच्या मंत्र्यांची इस्रायलवर टीका

हमासविरोधातील युद्धामध्ये इस्रायल पॅलेस्टिनी लोकांना एकत्रितपणे शिक्षा देत असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाचे मंत्री एड हुसिक यांनी ऑस्ट्रेलियान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनशी बोलताना केला. इस्रायली सरकारने युद्धाच्या आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करायला हवे आणि निरपराध लोकांचे संरक्षण करायला असे ते म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांचा आरोग्य व्यवस्थेबद्दल इशारा

गाझामधील रुग्णालयात झालेल्या स्फोटामुळे या भागातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवरील तणाव अधिक वाढल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांचे मानवतावादी उपक्रमांचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ यांनी दिला. गाझामधील रुग्णालयांमध्ये दरवर्षी साधारण ४५ हजार रुग्णांवर उपचार केला जातो. युद्धामुळे परिस्थिती अधिक बिकट झाल्याचे ग्रिफिथ यांनी नमूद केले.