जगभरातील मध्यवर्ती बॅंकांवर व्याजदर कमी करण्यासाठी दबाव येत असल्याबद्दल रिझव्‍‌र्ह बॅंकेचे गव्‍‌र्हनर रघुराम राजन यांनी चिंता व्यक्त केली. केवळ व्याजदर कमी करून आणि करसवलत देऊन गुंतवणूक वाढणार नाही. ग्राहकांची मागणीच आर्थिक विकासाला चालना देत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.  
राजन न्यूयॉर्क येथे एका आर्थिक संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी सक्षम आणि उत्तम भांडवल असणाऱ्या बहुस्तरीय संस्थेची गरज असल्याचेही राजन म्हणाले. सध्याचे आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरण शाश्वत विकास व आर्थिक क्षेत्रासाठी मोठय़ा जोखमीचे आहे. औद्योगिक देश व नव्याने उदयास येणाऱ्या बाजारपेठांची ही समस्या नसून तो सामूहिक कृतीचा परिपाक आहे. यामुळेच स्पर्धात्मक व्याजदर कपातीसाठी आर्थिक संस्थांवर दबाव येत आहे, असे राजन यांनी सांगितले.
शिष्टाचाररहित धोरणांमुळे उद्भवणारा आर्थिक क्षेत्रातील धोका कमी करण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरू आहे. आर्थिक आंतरराष्ट्रीय सुरक्षा जाळ्याच्या माध्यमातून मुक्त व्यापार, खुली बाजारपेठ उपलब्ध करता येईल. त्यासाठी प्रत्येकाला आपल्या देशात खूप कष्ट घ्यावे लागतील, असे राजन म्हणाले. मोदी सरकारकडून खूपच अपेक्षा ठेवल्या आहेत, मात्र कोणत्याही सरकारकडून इतक्या मोठय़ा अपेक्षा ठेवणे वास्तववादी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा