पीटीआय, लंडन : ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना खलिस्तान समर्थक अतिरेक्यांनी शुक्रवारी स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरातील गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून रोखले. दोराईस्वामी स्कॉटलंडच्या दोनदिवसीय दौऱ्यावर गेले होते. भारताने या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. दोराईस्वामी यांचा ‘अल्बर्ट ड्राइव्ह’ येथे असलेल्या ‘ग्लासगो गुरुद्वारा गुरु ग्रंथ साहिब’ची ही नियोजित भेट होती. या नियोजित भेटीदरम्यान, ‘शीख युथ, युके’ संघटनेचे सदस्य दोराईस्वामी यांच्या मोटारीजवळ आले आणि त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले.
संघटनेच्या सदस्यांनी त्याबाबतची ध्वनिचित्रफीतही प्रसारित केली. स्कॉटलंड पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले, की शुक्रवारी, २९ सप्टेंबरला दुपारी १ वाजून ०५ मिनिटांनी अल्बर्ट ड्राइव्ह परिसरात वाद झाल्याची फिर्याद आल्यानंतर पोलिसांना तेथे पाचारण करण्यात आले होते. या वेळी कोणताही गैरप्रकार झालेला नाही वा कुणी जखमीही झालेले नाही. स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पोलीस सखोल चौकशी करत आहेत. ग्लासगोमधील वादानंतर समाजमाध्यमावर प्रसारित झालेल्या एका ध्वनिचित्रफितीत एक शीख व्यक्ती ‘‘आपण कोणत्याही भारतीय राजदूताचे किंवा भारत सरकारच्या कोणत्याही अधिकृत प्रतिनिधीचे स्वागत अशाच पद्धतीने करणे गरजेचे आहे,’’ असे वक्तव्य करताना आढळते.
याप्रकरणी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुद्वारा समितीच्या विनंतीवरून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. दूतावास आणि इतर बाबींशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी समितीने बैठक बोलावली होती. काही बाहेरील व्यक्ती आणि मूलतत्त्ववादी घटकांच्या अनावश्यक वादामुळे शांतताप्रिय शीख बांधवांच्या संवादाच्या भूमिकेला बाधा निर्माण झाली आहे.
जगतारसिंगचा मुद्दा उपस्थित
स्कॉटलंडचे ‘फस्र्ट मिनिस्टर’ हमजा युसूफ आणि उच्चायुक्त दोराईस्वामी यांच्या भेटीत दहशतवादाच्या आरोपाखाली भारतात अटकेत असलेला ब्रिटिश शीख जगतारसिंग जोहल यांच्या संदर्भातील मुद्दाही उपस्थित करण्यात आला. ‘‘जोहल याच्याविरुद्ध आठ गंभीर गुन्हे दाखल असून या प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेचे योग्य पालन केले जात आहे,’’ असा संदेश दोराईस्वामी यांनी समाजमाध्यमावर प्रसारित केला.
भारत-स्कॉटलंड सहकार्य
- भारतातील मुक्त लोकशाहीत सर्व समुदायांच्या हक्कांची हमी सरकार घेते, अशी ग्वाही उच्चायुक्त दोराईस्वामी यांनी दिली. त्याबद्दल हमजा युसूफ यांनी प्रशंसा केली.
- भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितले, की स्कॉटिश नेत्यांशी झालेल्या चर्चेत अर्थ-तंत्रज्ञान, शाश्वत शेती, पर्यटन आणि जलसंवर्धन आदी क्षेत्रांत भारत-स्कॉटलंड सहकार्यावर भर देण्यात आला.
निंदनीय प्रकार
भारत ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त दोराईस्वामी यांना खलिस्तानवाद्यांनी गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखल्याच्या प्रकाराचा भारताने शनिवारी तीव्र निषेध केला. भारतीय उच्चायुक्तांनी एका निवेदनाद्वारे या घटनेचे वर्णन ‘निंदनीय’ असे केले.