सुधारणांच्या लाटेवर आर्थिक विकास वर झेपावण्याचा आशावाद केंद्र सरकारला असतानाच सप्टेंबरमध्ये झालेल्या डिझेल दरवाढीमुळे महागाईचा दर मात्र वर झेपावला आहे. आर्थिक सुधारणेचा भाग म्हणून झालेल्या डिझेल दरवाढीचा फटका जवळपास सर्वच वस्तूंना बसल्याने महागाईचा दर सप्टेंबरमध्ये दहा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर, ७.८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळी या ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना वाढत्या महागाईला तोंड द्यावे लागण्याची चिन्हे आहेत.
ऑगस्ट २०१२ मधील ७.५५ टक्क्यांच्या तुलनेत चढा तर नोव्हेंबर २०११ मधील ९.४६ नंतर सर्वाधिक महागाई दर सरलेल्या सप्टेंबरमध्ये महागाई निर्देशांकाने दाखविला. डिझेलमध्ये केल्या गेलेल्या प्रति लिटर ५ रुपयांच्या दरवाढीचा थेट परिणाम म्हणून जवळपास सर्वच वस्तूंच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. रिझव्र्ह बँकेकडून ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सर्वसाधारण अपेक्षा करण्यात येत असलेल्या व्याजदर कपातीच्या शक्यतेला यातून खूपच अत्यल्प वाव राहिला आहे. महागाई निर्देशांकात प्रधान वाटा असलेल्या ‘इंधन’ आणि ‘ऊर्जा’ घटकाच्या किमती ऑगस्टमधील ८.३२ टक्क्यांवरून ११.८८ टक्के अशी सपाटून वाढल्या. डिझेल दरवाढीतून वाहतुकीचा वाढलेला खर्च पाहता अन्नधान्य व भाज्या व फळफळावळीच्या किमती वाढतील, असे मानले जात होते. त्या तुलनेत अन्नधान्यातील किमती वाढण्याचे प्रमाण इतके तीव्र स्वरूपाचे नाही. ऑगस्टमध्ये ९.१४ टक्के स्तरावर असलेला अन्नधान्य महागाई दर सप्टेंबरमध्ये ७.८६ टक्क्यांवर घसरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा