नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीचा पुन्हा भडका उडाला आहे. सिलिंडरच्या किमतीत बुधवारी २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असून, जानेवारीपासून सिलिंडर १६५ रुपयांनी महाग झाला आहे.
नव्या दरवाढीमुळे, १४.५ किलोग्रॅम वजनाच्या अनुदानित सिलिंडरची किंमत मुंबईत ८५९.५०, तर दिल्लीत ८५९ रुपये होईल. कोलकाता व चेन्नईत याच किमती अनुक्रमे ८८६ रुपये व ८७५.५० रुपये होतील.
याआधी १ जुलैला सिलिंडरच्या किमतीत २५.५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. १ ऑगस्टला संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने, विरोधकांचा रोष टाळण्यासाठी गॅस सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीतील या ताज्या वाढीमुळे, १ जानेवारीपासून सिलिंडर एकूण १६५ रुपयांनी महाग झाला आहे. घरगुती गॅसच्या किमती दर महिन्यात वाढवून सरकारने त्यावरील अनुदान समाप्त केले. त्यामुळे करोनाकाळात उत्पन्न घटले असताना सामान्यांना महागाईची मोठी झळ बसत आहे.