नव्वद रुपये प्रति लिटर असलेलं पेट्रोल लवकरच, कदाचित ऐन दिवाळीतच शंभरी पार करू शकतं असे स्पष्ट संकेत आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळत आहेत. भारतातल्या पेट्रोल व डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधन तेलाच्या दरांवर अवलंबून असतात. सध्या कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव प्रति बॅरल 80 डॉलर्सच्या आसपास आहे. या वर्षाअखेरीपर्यंत हा दर शंभर डॉलर्स पार करू शकतो असा अंदाज सिंगापूरमध्ये एशिया पॅसिफिक पेट्रोलियम कॉन्फरन्समध्ये व्यक्त करण्यात आला आहे. या क्षेत्रातल्या तज्ज्ञ कंपन्यांनी या परिषदेत वर्तवलेल्या अंदाजानुसार इराणवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे कच्च्या तेलाचा भाव कडाडण्याची शक्यता आहे.

या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत इराणवरील निर्बंधांमुळे प्रति दिन कच्च्या तेलाच्या 20 लाख बॅरलचा तुटवडा जाणवणार आहे. बाजारात इतकं तेल कमी आलं तर कुठलीही पर्यायी व्यवस्थेच्या अभावी कच्च्या तेलाच्या किमती आणखी भडकतील असं मर्युरिया एनर्जी ट्रेडिंग या कंपनीचे अध्यक्ष डॅनियल जाग्गी यांनी सांगितले. त्यामुळे वर्षाअखेरीस किंवा 2019च्या सुरूवातीला हा भाव 100 डॉलर्सच्या पार जाऊ शकतो असे जाग्गी यांनी सांगितल्याचे वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे.

अमेरिकेनं इराणवर आर्थिक निर्बंध तर लागू केले आहेतच, परंतु त्याबरोबरच नोव्हेंबर 4 पासून इराणच्या तेलाच्या निर्यातीवरही हल्लाबोल करण्याचे संकेत दिले आहेत. इराणकडून कच्चे तेल घेऊ नये यासाठी अमेरिका अन्य देशांवरही दबाव टाकत आहे. परिणामी ख्रिसमसच्या सुमारास कच्च्या तेलाचे भाव 90 डॉलर्स प्रति बॅरल होऊ शकतात, आणि नवीन वर्षाच्या आगमनावेळी हा भाव शंभरी पार करू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आत्ताच कच्च्या तेलाचा भाव चार वर्षांच्या उच्चांकावर आहे.

 

पेट्रोल निर्यात करणाऱ्या ओपेक या संघटनेनं कच्च्या तेलाचा भाव वाढावा यासाठी उत्पादन नियंत्रणात ठेवलेलं आहे. व्हेनेझुएला, लिबिया व नायजेरिया या देशांनाही तेल उत्पादनाच्या बाबतीत अचानक काही समस्यांना सामोरे जावं लागलं आहे. आणि या सगळ्यात भर म्हणजे जगाची कच्च्या तेलाची मागणी इतिहासात प्रथमच 10 कोटी बॅरल प्रतिदिन या विक्रमी आकड्याच्या जवळ जात आहे. या सगळ्याची गोळाबेरीज कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव वाढण्याची शक्यता दर्शवतात, परिणामी भारतामध्येही 90 रुपये प्रति लिटरच्या घरात असलेल्या पेट्रोलच्या दरानं ऐन दिवाळीत शंभरी पार केली तर आश्चर्य वाटायला नको.

Story img Loader