तामिळनाडूमधील एका मंदिरामध्ये पुजा करताना झालेल्या एका विचित्र अपघातामध्ये पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कामाकल मंदिरामधील ही घटना एका भाविकाच्या मोबाइल कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
या अपघाताचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसते त्याप्रमाणे पुजाऱ्याने अंजनेय स्वामींच्या उंच मुर्तीला एका चौथऱ्यावरून हार घातला. त्यानंतर मागे येताना त्यांचा तोल गेला आणि ते जवळजवळ पंधरा फूट उंचीच्या चौथऱ्यावरून जमीनीवर कोसळले. पुजारी खाली पडल्यानंतर इतर पुजाऱ्यांनी त्यांना सावरण्यासाठी धाव घेतली. तातडीने इतर पुजाऱ्यांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमी पुजाऱ्याच्या डोक्याला जबर मार लागल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते. या पुजाऱ्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मरण पावलेल्या पुजाऱ्याचे नाव व्यंकटेश असे आहे. अंजनेय स्वामींच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर मागे सरकताना चौथऱ्याच्या आकाराचा अंदाज न आल्याने व्यंकटेश यांचा तोल गेला आणि ते खाली पडले.
मंगळवारी झालेल्या या धक्कादायक घटनाक्रमाआधी पंजाबमध्येही अशाच प्रकारच्या एका अपघातामध्ये प्राण गमावावे लागले. पंजाबमधील मुकस्तर येथील गुरुद्वारेमधील पुजाऱ्याचा बाईक आणि कारच्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ५५ वर्षांच्या गुरमुख सिंग यांच्या बाईकची गाडीची जोरदार धडक झाल्यानंतर सिंग यांचा जागीच मृत्यू झाला.