मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सत्यनारायण पूजेचा चुकीचा परिणाम झाल्याचा आरोप करत यजमानांनी पुजाऱ्याला मारहाण केल्याची घटना इंदूरमध्ये घडली आहे. राजस्थानच्या कोटामधील रहिवासी असलेले पुजारी कुंजबिहारी शर्मा हे या घटनेत जखमी झाले आहेत. यजमानाच्या मुलाला जोडीदार मिळत नसल्याने ही पूजा करण्यात आल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले आहे.
“…तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल” कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान
गुरुवारी रात्री यजमान आणि त्यांच्या दोन मुलांनी कुंजबिहारी शर्मा यांना मारहाण केली, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अभय नेमा यांनी ‘पीटीआय’ या वृत्त संस्थेला दिली आहे. “स्कीम नंबर ७१ मधील रहिवाशांनी कुंजबिहारी यांना रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस ठाण्यात आणले होते. ७० वर्षीय या पुजाऱ्याला लक्ष्मीकांत शर्मा यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याठिकाणी पूजा केल्यानंतर कुंजबिहारी घरी परतले. त्यानंतर रात्री उशिरा शर्मा आणि त्यांच्या दोन मुलांनी विपुल आणि अरूण यांनी पुजाऱ्याला मारहाण केली”, अशी माहिती नेमा यांनी दिली आहे.
या मारहाणीदरम्यान विपुलने पुजाऱ्याच्या कानाचा चावा घेतला. सत्यनारायण पूजेचा विधी चुकीचा केल्याने अरूण विचित्र वागू लागला, असा दावा हल्लेखोरांनी केला आहे. हल्लेखोरांच्या तावडीतून कुंजबिहारी यांना सोडवून त्यांना शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी लक्ष्मीकांत शर्मा आणि त्यांच्या दोन मुलांना अटक करण्यात आली आहे.