वृत्तसंस्था, दमास्कस

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीरियाच्या बंडखोरांनी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्याचे आणि अध्यक्ष बशर अल असाद यांची राजवट उलथवून टाकल्याचे रविवारी सरकारी वाहिनीवरून जाहीर केले. तसेच, तुरुंगातील सर्व कैद्यांची मुक्तता करत असल्याचेही बंडखोरांनी घोषित केले. बंडखोर दमास्कसमध्ये शिरत असताना लष्कराने आधीच माघार घेतली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असाद यांनी दमास्कस सोडले असून ते देशाबाहेर गेले असल्याचा दावा रशियाने केला आहे.

सीरियाच्या सरकारी वाहिनीवर रविवारी निवेदन वाचून दाखवणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, ‘ऑपरेशन्स रूम टू कॉन्कर दमास्कस’ नावाच्या विरोधी गटाने सर्व बंडखोर गट आणि नागरिकांनी मुक्त सीरिया राष्ट्राचे जतन करावे. दमास्कस ताब्यात घेतल्यानंतर बंडखोर इराणच्या दूतावासामध्ये घुसले आणि तिथे मोडतोड केली. परिस्थिती लक्षात घेऊन इराकने आपले दूतावास रिकामे केले असून तेथील कर्मचाऱ्यांना लेबनॉनमध्ये हलवले. दरम्यान, लेबनॉनने बैरुतला दमास्कसशी जोडणारा मार्ग वगळता सीरियाबरोबरची भूसीमा बंद करत असल्याचे सांगितले आहे. आमच्या नागरिकांना देशाबाहेर जाऊ दिले जावे असे आवाहन चीनने तेथील संबंधित पक्षांना केले आहे. भारतानेही शनिवारीच आपल्या नागरिकांसाठी धोक्याची सूचना जारी केली आहे. त्याशिवाय अन्य देशही आपापल्या नागरिकांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत.

अमेरिकेचे सैन्य पूर्व सीरियामध्ये कायम राहील आणि ‘इस्लामिक स्टेट’चे पुनरुज्जीवन होऊ नये यासाठी खबरदारी घेईल असे ‘पेंटागॉन’चे अधिकारी डॅनियल शापिरो यांनी रविवारी बहारीनमध्ये मनामा डायलॉग या सुरक्षाविषयक परिषदेत स्पष्ट केले. बंडखोरांनी शनिवारीच ऐतिहासिक होम्स शहराचा ताबा मिळवला होता. त्याशिवाय हमा शहर आणि ग्रामीण भागातील डेरा भाग त्यांनी नियंत्रणाखाली आणला आहे. मात्र, हा सर्व भाग सोडवण्यासाठी मोहीम आखण्यात आल्याचे सीरियाच्या लष्कराने जाहीर केले आहे.

हेही वाचा >>>हृदय शस्त्रक्रियेद्वारे तीन जणांना जीवदान! पश्चिम भारतातील दुर्मिळ शस्त्रक्रिया…

असद यांच्याकडे रशिया, इराणची पाठ

इराण आणि रशियाच्या पाठिंब्याच्या जोरावर असद यांना आतापर्यंत सत्ता टिकवण्यात यश आले होते. दोन वर्षांपूर्वीपासून रशिया युक्रेनबरोबरच्या युद्धात गुंतलेला आहे. सीरियाने या परिस्थितीचा स्वत:च सामना करावा असे रशियन पार्लमेंटच्या वरिष्ठ सभागृहाचे उपाध्यक्ष कॉन्स्टँटिन कोसाच्योव्ह यांनी रविवारी सांगितले. इस्रायलने खिळखिळा केलेल्या लेबनॉनमधील हेजबोला गटाला बळ देण्यात इराण व्यस्त आहे. त्यामुळेच सीरियात बंडखोर आगेकूच करत असताना इराणने शुक्रवारी आपले लष्करी कमांडर आणि सैनिक माघारी घेण्यास सुरुवात केली होती.

सरकार विरोधकांबरोबर काम करायला तयार आहे, आम्ही सत्तेच्या हस्तांतरणादरम्यान एकत्रित काम करू शकतो. असद आणि संरक्षणमंत्री जनरल अली महमूद अब्बास कुठे आहेत हे मला माहीत नाही.मोहम्मद गाझी जलाली, पंतप्रधान, सीरिया

असद गेले आहेत. ते देश सोडून पळाले. व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशिया यापुढे त्यांचे संरक्षण करण्यास उत्सुक नाही. रशिया आणि इराण आता दुर्बळ राष्ट्रे आहेत.- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष

लक्षावधी सीरियन लोकांनी स्पष्टपणे अशी इच्छा व्यक्त केली आहे की त्यांना स्थिर आणि सर्वसमावेशक सरकार हवे आहे. सीरियाच्या सर्व घटकांनी संवाद, ऐक्य आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि मानवी हक्क याबद्दल आदर राखावा.- गायर पेडेरसन, सीरियासाठी विशेष दूत, ‘यूएन’

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister announces free elections in syria amy