मधुबनी (बिहार) पीटीआय
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली जाईल, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत व्यक्त केला. हल्ल्यानंतर केलेल्या या पहिल्याच जाहीर भाषणात त्यांनी दहशतवाद्यांची उरलीसुरली ताकद संपवण्याची वेळ आल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला ठणकावले.
देशाच्या शत्रूंनी केवळ नि:शस्त्र पर्यटकांवर नव्हे, तर देशाच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे दु:साहस केले. दहशतवादी कारवाया देशाचे मनौधैर्य खच्ची करू शकणार नाहीत असेही त्यांनी येथील सभेत बजावले. हल्ल्याच्या घटनेनंतर त्यांचे पहिलेच भाषण होते. भाषणात काही वेळ पंतप्रधानांनी इंग्रजीतून संवाद साधत जगाला संदेश देत, विविध देशांतील नेत्यांनी या प्रसंगी भारताला साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. पंतप्रधानांनी पाकिस्तानचे नाव न घेता पहलगाम हल्ल्यामागे कोण आहेत हे त्यांनी सूचित केले. तसेच १४० कोटी देशवासीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांचे कंबरडे मोडेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. हल्लेखोर व त्यांचे पाठीराखे यांना सोडणार नाही असा स्पष्ट संदेश पंतप्रधानांनी भाषणातून वारंवार दिला.
भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत देशवासीयांचा संताप सारखाच आहे असे त्यांनी स्पष्ट केले. भारत प्रत्येक दहशतवाद्याला शिक्षा देईल तसेच त्यांच्या पाठीराख्यांनाही धडा शिकवेल असा निर्धार पंतप्रधानांनी सभेत व्यक्त केला. ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे ते भारताच्या पाठीशी उभे राहिल्याचे त्यांनी नमूद केले. प्रगतीसाठी शांतता आणि सुरक्षा महत्त्वाची असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.