ढिसाळ कारभार आणि भ्रष्टाचारामुळे कर्नाटकच्या प्रगतीचा आलेख मंदावला असल्याची टीका पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी हुबळीमधील जाहीर सभेत केली. येत्या पाच मे रोजी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान हुबळीमध्ये आले होते. आपल्या भाषणात डॉ. सिंग यांनी राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढविला.
ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत भाजपने राज्यात तीन वेळा मुख्यमंत्री बदलले. भाजपच्या विविध राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू झालीये. ढिसाळ राज्यकारभार, विकासकामांबद्दल सत्ताधाऱयांमध्ये असलेली अनास्था आणि भ्रष्टाचार या सगळ्यामुळे कर्नाटक राज्याचा विकास खुंटला आहे.
राज्यात गेल्या पाच वर्षांमध्ये ना कृषी क्षेत्राकडे लक्ष दिले गेले, ना रोजगारनिर्मितीकडे. राज्यातील सिंचनाचे अनेक प्रकल्प अद्याप अपूर्ण आहेत. जे प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तेथील काम निकृष्ठ दर्जाचे असल्याची टीकाही डॉ. सिंग यांनी यावेळी केली. पायाभूत सुविधांचा विकास करण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याने अनेक उद्योजकांनी कर्नाटकाऐवजी हैदराबाद आणि पुण्याला जाण्यास पसंती दिलीये. राज्यातील अल्पसंख्याकांना असुरक्षितता वाटते आहे, याकडेही त्यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले.

Story img Loader