पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी राज्यसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्यावेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पंतप्रधानांनी आपल्याकडे अजिबात रोख रक्कम नसल्याचे म्हटले आहे, तर त्यांच्या नावे १९९६ सालची मारूती ही एकमेव गाडी आहे.
पंतप्रधानांच्या खासदारकीची मुदत १४ जून या दिवशी संपुष्टात येत आहे. त्या पाश्र्वभूमीवर आसाममधील दोन जागांसाठीच्या निवडणुकीची अधिसूचना सोमवारी काढण्यात आली. आपला अर्ज दाखल करण्यासाठी पंतप्रधान बुधवारी येथे दाखल झाले. अर्जासोबत पंतप्रधानांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पंतप्रधानांनी आपले वार्षिक उत्पन्न ४० लाख ५१ हजार इतके दाखवले आहे. त्यांची जंगम मालमत्ता ३ कोटी ८७ लाख ६३ हजार तर स्थावर मालमत्ता ७.५२ कोटी इतकी आहे. मात्र, त्यांच्याकडे रोख रक्कम अजिबात नाही. अर्थात पंतप्रधानांच्या पत्नी गुरशरन कौर यांच्याकडे २० हजार रोख रक्कम आहे.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पंतप्रधानांनी पत्रकारांशी संवाद साधताना आसामप्रति कृतज्ञता व्यक्त केली. राज्यसभेत आसामचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला गेली २१ वर्षे मिळत आहे. यासाठी मी आसामचा व येथील नागरिकांचा आभारी असून आसामची भरभराट व्हावी, यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.