आपल्या देशात सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचं विभाजन करण्याची इच्छा आहे असेच दिसून येते आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या रॅलीत ते बोलत होते. सध्या देशात अशी परिस्थिती आहे की तळागाळातील लोकांना, मागासवर्गीयांना धमकावले जात आहे. तर स्त्रियांन घराबाहेर पडण्याचीही भीती वाटते आहे यामागे एकच कारण आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विभाजनाचं धोरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातल्या गरीब-श्रीमंत, मागास आणि उच्च अशा वर्गांमध्ये दरी निर्माण करायची आहे. त्याचमुळे देशातले वातावरण त्यांनी अस्थिर केले आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या आणि काही महिन्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. राफेल करारावरून, वाढत्या महागाईवरून, पेट्रोल आणि डिझेलच्या प्रश्नावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तरुणाच्या बेरोजगारीबाबतही वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत मोदींना देशाचं विभाजन करायचं आहे असा आरोप केला आहे. एवढंच नाही तर महिला देशात सुरक्षित नाहीत आणि गरीब आणि मागासवर्गींयांना धमकावले जाते आहे असाही आरोप त्यांनी केला आहे.

राफेल करार हा मोदी सरकारने केलेला सर्वात मोठा घोटाळा आहे असाही आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि आगामी काळात येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने या आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाने मात्र राहुल गांधी यांचे आरोप फेटाळले आहेत. आता राहुल गांधी यांच्या नव्या आरोपांना भाजपाकडून कसे उत्तर दिले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Story img Loader