सरबजितसिंगच्या निधनाबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी गुरुवारी तीव्र दुःख व्यक्त केले. सरबजित हा भारताचा शौर्यवान सुपूत्र होता, अशी भावना मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली. मानवतेच्या दृष्टिने सरबजितची सुटका करावी, ही भारताची मागणी न ऐकल्याबद्दल पंतप्रधानांनी पाकिस्तानवरही आपल्या शोकसंदेशात टीका केली.
सरबिजतचे बुधवारी रात्री लाहोरमधील कारागृहात निधन झाले. त्याच्यावर पाकिस्तानातील कारागृहात कैद्यांनी हल्ला केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. गेल्या एक आठवड्यापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. सरबजितचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सरकारतर्फे व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर कुटुंबियांच्या इच्छेनुसार सरबजितवर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असेही मनमोहनसिंग यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
हा तर शांत डोक्याने केलेला खून
सरबजितचे निधन म्हणजे शांत डोक्याने करण्यात आलेला खून असल्याची प्रतिक्रिया लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली. ट्विटरवर आपल्या संदेशात त्यांनी पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली. कोणताही सुसंस्कृत देश अशा पद्धतीचे वर्तन करीत नाही, असेही स्वराज यांनी म्हटले आहे.

Story img Loader